व्यवस्था असेल तर होम आयसोलेशनचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 11:48 PM2020-09-09T23:48:54+5:302020-09-09T23:50:51+5:30
लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी जर घरात व्यवस्था असेल तर होम आयसोलेशन हा पर्याय आहे. अशा रुग्णांनी शासन आणि मनपाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करावे. डॉक्टरांशी समन्वय ठेवावा, असे आवाहन आय.एम.ए.चे माजी अध्यक्ष डॉ. आनंद काटे यांनी केले.
लोकमन न्यूज नेटवर्क
नागपूर : लक्षणे नसलेल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी जर घरात व्यवस्था असेल तर होम आयसोलेशन हा पर्याय आहे. अशा रुग्णांनी शासन आणि मनपाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करावे. डॉक्टरांशी समन्वय ठेवावा, असे आवाहन आय.एम.ए.चे माजी अध्यक्ष डॉ. आनंद काटे यांनी केले.
मनपा आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांसाठी ‘कोविड संवाद’ या शीर्षकांतर्गत ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून संवाद उपक्रमाला बुधवारी सुरुवात झाली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. आनंद काटे आणि डॉ. अर्चना कोठारी उपस्थित होत्या. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी प्रारंभी कोविड संवाद मागील संकल्पना विषद केली. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांना उपचाराबाबत माहिती देणे गरजेचे आहे. लक्षणे नसलेले रुग्ण अधिक आहे, जे सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. त्यांना यादरम्यान काय करायचे, याबाबत मार्गदर्शन व त्यांच्या मनातील शंका, प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोठारी यांनी होम आयसोलेशनमधील रुग्णांना नेहमीच पडत असलेले प्रश्न विचारले. या प्रश्नांना काटे यांनी समर्पक उत्तरे दिलीत. घरात जर स्वतंत्र खोली, बाथरूम, शौचालय स्वतंत्र असेल अशा व्यक्तींनीच होम आयसोलेशनचा पर्याय निवडावा, आयसोलेशन दरम्यान शासनाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे, नियमित मास्क घालावा, कुटुंबातील लोकांना दूर ठेवावे, डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचे न चुकता सेवन करावे, अशी उपयुक्त माहिती दिली.
आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करा
आरोग्य सेतू अॅप मोबाईलमध्ये डाऊनलोड करून ठेवावा. आयसोलेशनदरम्यान त्रास जाणवत असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ताप आणि आॅक्सिजन लेव्हल सातत्याने तपासावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
नियम पाळा, काळजी घ्या!
अनेकांनी फेसबुकवर विचारलेल्या प्रश्नांनाही काटे आणि कोठारी यांनी उत्तरे देत रुग्णांचे समाधान केले. नियम पाळा, काळजी घ्या, प्रत्येकाला कोरोना आहे, या भावनेतून सामाजिक अंतर पाळा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आज गुरुवारी दुपारी २ वाजेपासून कोविड संवाद कार्यक्रमामध्ये डॉ. रवींद्र सरनाईक आणि डॉ. अर्चना कोठारी नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे देतील.