गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग, घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:07 AM2021-07-26T04:07:12+5:302021-07-26T04:07:12+5:30

नागपूर : बांधकाम क्षेत्रासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती लॉकडाऊनदरम्यान वाढल्याने घराच्या किमतीतही वाढ झाली आहे. याशिवाय बांधकाम क्षेत्रासमोर अनेक ...

Home loans are cheap, but construction materials are expensive. When will the dream of owning a house come true? | गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग, घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार?

गृहकर्ज स्वस्त, पण बांधकाम साहित्य महाग, घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार?

Next

नागपूर : बांधकाम क्षेत्रासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती लॉकडाऊनदरम्यान वाढल्याने घराच्या किमतीतही वाढ झाली आहे. याशिवाय बांधकाम क्षेत्रासमोर अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत. सिमेंट आणि स्टीलच्या किमतीने बेसिक ते प्रीमियम घराच्या किमतीत प्रति चौरस फूट ३०० ते ५०० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. वाढत्या किमतींमुळे नवीन प्रकल्प सुरू न झाल्याने आणि जुन्या घरांची विक्री होत नसल्याने बिल्डर्स चिंतेत आहेत. त्यातच सिमेंट, स्टील, रेती, बजरी आणि पाईपच्या किमतीत भर पडल्याने बांधकाम उद्योजकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्याचबरोबर लोकांचे घर घेण्याचे स्वप्न कधी पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

बांधकाम साहित्याच्या किमतीत एका वर्षात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सहा महिन्यांपूर्वी एक हजार रुपयांच्या सिवेज पाईपची किंमत १४०० रुपयांवर पोहोचली आहे. या मालाच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची किंमत वाढल्याने नाईलाजाने भाववाढ करावी लागल्याचे उत्पादकांचे मत आहे. याशिवाय लोखंडी सळई, इन्स्युलेशन सामान, हार्डवेअर वस्तूंच्या किमतीत ५० ते ६० टक्क्यांची वाढ झाली आहे. बँकांनी गृहकर्जाचे दर कमी केले, पण बांधकाम साहित्याच्या किमतीत वाढ झाल्याने बिल्डर्सनी सध्या घराच्या किमती वाढविल्या नाहीत, पण पुढे ३०० ते ५०० रुपये चौरस फुटाची वाढ अपेक्षित असल्याचे महाराष्ट्र क्रेडाई मेट्रोचे माजी अध्यक्ष प्रशांत सरोदे यांनी सांगितले.

प्रकल्पाचा वेग मंदावला

कोरोना काळानंतर घरविक्रीला मर्यादा आली आहे. बिल्डर्सच्या कार्यालयात घर खरेदीसाठी विचारणा करणारे ग्राहक फार कमी येत आहेत. मजूर नसल्याने बिल्डर्स जुनेच प्रकल्प पूर्ण करीत होते. आताही नवीन प्रकल्प सुरू करण्यास कुणीही पुढे येत नाहीत. सिमेंटची निर्मिती करणाऱ्या ४ ते ५ कंपन्या असल्याने त्यांनी कार्टेल तयार करून भाव खूपच वाढविले आहेत. याशिवाय स्टील कंपन्याही भाव वाढवित आहेत. सरकारने यावर नियंत्रण आणण्यासाठी प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी प्रशांत सरोदे यांनी केली.

असे आहेत गृहकर्ज दर (टक्केवारीत)

स्टेट बँक ऑफ इंडिया - ६.७५

बँक ऑफ इंडिया - ६.७०

पंजाब नॅशनल बँक - ७

बँक ऑफ महाराष्ट्र - ७.०५

एचडीएफसी बँक - ६.७५

आयसीआयसीआय - ६.७५

बांधकाम साहित्यात स्वस्ताई नाहीच !

साहित्य २०१८ २०१९ २०२० २०२१ (जुलै)

सिमेंट (प्रति बॅग) २४० २६० २७० ३८०

विटा (प्रति नग) ४ ४.२५ ४.५० ६

रेती (क्यु. फूट) २२ २५ २७ ३०-४०

बजरी (क्यु. फूट) २५ २७ ३० ४०

स्टील (प्रति किलो) ३६ ४० ४३ ६५-७५

गावापासून दूर घरे स्वस्त, पण जाणे-येणे महाग

- नागपूर शहरात जमिनीच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. जमीन विकत घेऊन घर बांधणे कठीण बनले आहे. याउलट गावात जमिनीच्या किमती स्वस्त असून त्यावर घर बांधणे महाग नाही. पण हे घर शहरापासून बरेच लांब असल्याने या ठिकाणी जाणे महाग ठरत आहे. गावात घर बांधण्यासाठी रेती, बजरी स्वस्त पडते. त्यामुळे शहरापासून दूरवर घर बांधण्याची प्रथा वाढत चालली आहे. याशिवाय शेतात घर बांधून त्या ठिकाणी वीकेंडला निवांतपणे राहण्याची संस्कृतीही आता वाढू लागली आहे. एवढेच आहे, की गावापासून दूर घरे स्वस्त, पण जाणे-येणे महाग पडत आहे.

साहित्य विक्रेते म्हणतात...

एक वर्षापासून बांधकाम साहित्याच्या किमती प्रचंड वाढल्याने व्यवसायावर परिणाम झाला आहे. घर दुरुस्तीची कामे वाढली असून नवीन घराऐवजी जुनेच घर फर्निश करण्याकडे सर्वांचा कल वाढत आहे. बांधकाम साहित्याच्या काही किमतीत दुपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांचा खरेदीकडे कल दिसत नाही.

- राकेश माटे, बांधकाम साहित्य विक्रेते.

सरकारचे नियंत्रण नसल्याने बांधकाम साहित्याच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. याशिवाय हार्डवेअरच्या वस्तू आणि रासायनिक वस्तूंच्या भावात ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. नवीन घर बांधण्यासाठी प्रत्येकाचे बजेट कोलमडत आहे.

- आकाश देवतळे, बांधकाम साहित्य विक्रेते.

घर घेणे कठीणच :

घराच्या किमतीत वाढ झाल्याने नागपुरात नवीन घर विकत घेणे कठीण बनले आहे. चांगले घर मिळविण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. सरकारच्या योजना आणि बँकिंग कर्जाचे दर आटोक्यात असल्याने थोडाफार दिलासा आहे.

- अर्नव जुगादे.

नागपुरात एरियानुसार घराच्या किमती आहे. चांगला फ्लॅट खरेदी करायचा असल्यास किमान ३५ ते ४० लाख रुपये मोजावे लागतात. बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्याने बिल्डर्सनी घराच्या किमती वाढविल्या आहेत.

- सुनील रहाटे.

Web Title: Home loans are cheap, but construction materials are expensive. When will the dream of owning a house come true?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.