देशाचे गृहमंत्री अमित शाह १८ फेब्रुवारीला ‘लोकमत’च्या मंचावर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 05:55 AM2023-02-16T05:55:12+5:302023-02-16T05:55:52+5:30

नागपूर आवृत्तीचा सुवर्ण महोत्सव व जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दीनिमित्त आयोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार सहभागी

Home Minister Amit Shah on the platform of 'Lokmat' on February 18 | देशाचे गृहमंत्री अमित शाह १८ फेब्रुवारीला ‘लोकमत’च्या मंचावर

देशाचे गृहमंत्री अमित शाह १८ फेब्रुवारीला ‘लोकमत’च्या मंचावर

Next

नागपूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तसेच ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि लोकमतनागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शनिवारी, १८ फेब्रुवारी रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला देशाचे गृहमंत्री अमित शाह हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी असतील. 

रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी ११ वाजता हा समारंभ होणार असून सुरक्षेच्या दृष्टीने निमंत्रितांनी १०.४५ पूर्वी स्थानापन्न होणे आवश्यक आहे. नागपूर येथून अमित शाह यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात हाेईल. १७ फेब्रुवारीला रात्री ७.४५ वाजता विमानाने आसामहून ते नागपूरला पोहोचतील. ते शहरात मुक्कामी असतील.

‘बाबूजी’ या पुस्तकाचे प्रकाशन
शनिवारी, १८ फेब्रुवारीला त्यांच्या हस्ते ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ‘सुवर्णमुद्रा’ विशेषांकाचे, तसेच ‘लोकमत’चे संस्थापक संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जीवनावरील ‘बाबूजी’ या पुस्तकाचे प्रकाशन, ‘लोकमत’च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त टपाल खात्याने काढलेल्या विशेष डाक तिकिटाचे अनावरण होईल. तसेच हे औचित्य साधून ‘लोकमत’ने तयार केलेले नागपूर गीत (ॲन्थम) गृहमंत्री अमित शाह हे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करतील. या कार्यक्रमाला ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा तसेच ‘एडिटर इन चीफ’ राजेंद्र दर्डा हेदेखील उपस्थित राहतील.

दीक्षाभूमी, संघ स्मृतिमंदिराला भेट : गृहमंत्री शाह शनिवारी सकाळी १०.५० वाजता दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेतील. त्यानंतर रा.स्व. संघाच्या रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिराला भेट देऊन आद्य सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधिस्थळी माल्यार्पण करतील. ते दुपारी दीड वाजता नागपुरातून पुण्याला प्रयाण करतील.

Web Title: Home Minister Amit Shah on the platform of 'Lokmat' on February 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.