गृहमंत्री अमित शाह यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2023 09:54 PM2023-02-17T21:54:16+5:302023-02-17T21:57:18+5:30

Nagpur News केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे शुक्रवारी रात्री विमानाने नागपुरात आगमन झाले. विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांनी जयघोष करीत जल्लोषात त्यांचे जंगी स्वागत केले.

Home Minister Amit Shah welcomed in Nagpur with jubilation | गृहमंत्री अमित शाह यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत

गृहमंत्री अमित शाह यांचे नागपुरात जल्लोषात स्वागत

googlenewsNext
ठळक मुद्दे‘लोकमत’ नागपूर आवृत्तीचा सुवर्ण महोत्सव व जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी महासोहळा उद्या

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे शुक्रवारी रात्री विमानाने नागपुरात आगमन झाले. विमानतळावर भाजप कार्यकर्त्यांनी जयघोष करीत जल्लोषात त्यांचे जंगी स्वागत केले. यानंतर विमानतळ परिसरात उभारण्यात आलेल्या मंचावर येत शाह यांनी जमलेल्या समर्थकांना हात उंचावत अभिवादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी भव्य हार घालून त्यांचे स्वागत केले.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, तसेच ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून शनिवारी सकाळी ११ वाजता नागपूरच्या रेशीमबागेतील कविवर्य सुरेश भट सभागृहात महासोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. विमानतळावर आगमनप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. कृपाल तुमाने, विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त अमितेषकुमार, माजी खासदार अजय संचेती, विकास महात्मे, आ. प्रवीण दटके, आ. समीर मेघे, आ. मोहन मते, आ. टेकचंद सावरकर, माजी आ. डॉ. मिलिंद माने, परिणय फुके आदींनी गृहमंत्री शाह यांचे स्वागत केले.

‘लोकमत’च्या सोहळ्याला सन्माननीय अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील उपस्थित राहतील. मान्यवरांच्या हस्ते ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ‘सुवर्णमुद्रा’ विशेषांकाचे, तसेच ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जीवनावरील ‘बाबूजी’ या पुस्तकाचे प्रकाशन, ‘लोकमत’च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त टपाल खात्याने काढलेल्या विशेष डाक तिकिटाचे अनावरण होईल. कार्यक्रम ठीक सकाळी ११ वाजता सुरू होणार असून, सुरक्षेच्या दृष्टीने निमंत्रितांनी १०:४५ पूर्वी स्थानापन्न होणे आवश्यक आहे. सोबत निमंत्रण पत्रिका व प्रवेशपत्र आणणे अनिवार्य आहे.

‘नागपूर मेरी जान, नागपूर मेरी शान’ ‘ॲन्थम’चेदेखील लोकार्पण

‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचा सुवर्ण महोत्सव आणि स्वातंत्र्यसंग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक-संपादक श्री जवाहरलालजी दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘लोकमत नागपूर ॲन्थम- नागपूर मेरी जान, नागपूर मेरी शान’चे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते शनिवारी सकाळी ११ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात होईल. लोकार्पणानंतर गृहमंत्री अमित शाह हे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ॲन्थम सुपुर्द करतील.

नागपूरचे देशातील असलेले वैशिष्ट्यपूर्ण स्थान, निसर्ग, पर्यटन, नागपूरकरांचा स्वभाव आदींचे वर्णन असलेल्या या ॲन्थमची संकल्पना लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांची असून, प्रसिद्ध पार्श्वगायक शंकर महादेवन यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे. रचना प्रशांत इंगोले यांची, तर अजिंक्य सोनटक्के यांनी हे गीत संगीतबद्ध केले आहे. संयोजन गौरी यादवडकर यांचे, तर सनी जैस्वाल यांनी चित्रीकरण केले आहे. एडिटिंग मुकुंद झरपुरिया आणि मिक्सिंग यशराज स्टुडिओचे विजय दयाल यांनी केले आहे. ‘लोकमत’ने अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर ॲन्थम उपलब्ध केले आहे. दिलेल्या ‘क्यूआर कोड’ला स्कॅन करून हे ॲन्थम पाहू शकता. हे ॲन्थम गृहमंत्री अमित शाह यांनी लोकार्पण केल्यानंतर दुपारी एकनंतर ॲक्टिव्हेट होईल.

Read in English

Web Title: Home Minister Amit Shah welcomed in Nagpur with jubilation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.