गृहमंत्री अमित शाह यांच्या ‘सौ’ नागपूरच्या शिवालयात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2023 08:44 PM2023-02-18T20:44:30+5:302023-02-18T20:45:05+5:30
Nagpur News देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या ‘सौ’ सोनल अमित शाह यांनी नागपुरात महाशिवरात्री साजरी केली.
नागपूर : देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या ‘सौ’ सोनल अमित शाह यांनी नागपुरात महाशिवरात्री साजरी केली. धार्मिक वृत्तीच्या सोनल शाह यांनी शनिवारी सर्वप्रथम तेलंगखेडी येथील ऐतिहासिक भोसलेकालीन प्राचीन कल्याणेश्वर शिव मंदिरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेत विधीविधानासह पूजन, अभिषेक घातला आणि त्यानंतर तेलंगखेडी हनुमान मंदिर व नंतर अष्टविनायकांपैकी अग्रपूजेचे मानकरी असलेल्या श्री टेकडी गणेशाचे दर्शन घेतले.
गृहमंत्री अमित शाह यांच्या नागपूर दौऱ्याच्या अनुषंगाने सोनल शाह या त्यांच्यासोबत शुक्रवारीच नागपुरात दाखल झाल्या होत्या. सोनल शाह यांची ही पहिली नागपूर भेट होती. शनिवारी सकाळपासूनच अमित शाह यांच्या निश्चित कार्यक्रमामुळे ते व्यस्त होते. त्यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार ते प्रथम दीक्षाभूमी व नंतर रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती मंदिरात दर्शनासाठी गेले होते आणि नंतर ‘लोकमत’च्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात सहभागी झाले होते. दरम्यान, सोनल शाह यांनी माजी मंत्री डॉ. परिणय फुके व माजी नगरसेविका डॉ. परिणिता फुके या दाम्पत्याकडे महाशिवरात्रीनिमित्त शिवालयात जाण्याची इच्छा प्रकट केली.
त्यानुसार फुके दाम्पत्याने त्यांना सकाळी ११ वाजता तेलंगखेडी येथील प्राचीन कल्याणेश्वर शिव मंदिरात नेले. हे देवस्थान शेवाळकर कुटुंबियांच्या खासगी प्रॉपर्टीमध्ये असल्याने आशुतोष शेवाळकर यांनी सोनल शाह यांचे स्वागत व सत्कार केला. त्यानंतर शिवभक्त सोनल शाह यांनी मनोभावे शिवलिंगाचे दर्शन घेतले. देवस्थान परिसर न्याहाळल्यानंतर त्या तेलंगखेडी हनुमान मंदिरात गेल्या आणि तेथे हनुमंताचे दर्शन घेतले आणि त्यानंतर श्री गणेश टेकडी मंदिर येथे श्री गणपतीचे दर्शन घेतले व पूजन केले.