'तरुणाईला अमली पदार्थपासून दूर ठेवा, सतर्कपणे काम करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 12:10 PM2021-10-22T12:10:51+5:302021-10-22T18:38:29+5:30

पोलीस ज्या सतर्कतेने आणि आक्रमकपणे काम करतात तशाच प्रकारे आता अमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी पोलिसांना काम करावे लागणार असल्याचे वगृहमंत्री दिलीप वळसे पाटील(Dilip Walse Patil) म्हणाले.

home minister Dilip Walse Patil on Central Intelligence And Investigative Agencies | 'तरुणाईला अमली पदार्थपासून दूर ठेवा, सतर्कपणे काम करा'

'तरुणाईला अमली पदार्थपासून दूर ठेवा, सतर्कपणे काम करा'

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अमली पदार्थाच्या विळख्यात सापडून तरुणाई उद्ध्वस्त होऊ शकते. हे ध्यानात घेऊन पोलिसांनी आता नक्षलवाद आणि दहशतवादाइतकेच गांभीर्याने अमली पदार्थाच्या तस्करीत लक्ष द्यावे, असा सल्ला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शुक्रवारी पोलीस दलाला दिला.

नागपुरातील पोलीस निवासस्थानाच्या नूतनीकरण आणि लोकार्पण सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून वनामतीच्या सभागृहात ते बोलत होते. यावेळी मंचावर पालकमंत्री नितीन राऊत, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे, अतिरिक्त आयुक्त सुनील फुलारी आणि नवीनचंद्र रेड्डी उपस्थित होते. नागपूर विदर्भातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा शुक्रवारी सकाळी गृहमंत्री वळसे-पाटील यांनी पोलीस जिमखान्यात घेतला. त्यानंतर त्यांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. गिट्टीखदान पोलीस ठाण्यासह शहरातील अन्य आठ पोलीस ठाण्यातील महिला विश्रामगृहाचे उद्घाटन केल्यानंतर ते वनामतीत पोहोचले. तेथे त्यांनी आपल्या भाषणातून पोलीस दलाच्या आधुनिकीकरणापासून तो समस्यांपर्यंतचा आढावा घेतला.

सध्या अमली पदार्थाचा विषय सर्वत्र चर्चेत आहे. त्याला स्पर्श करताना गृहमंत्री वळसे-पाटील यांनी अमली पदार्थ आणि दुष्परिणामाचे सांकेतिक विश्लेषण केले. दहशतवाद आणि नक्षलवादाचा बीमोड करण्यासाठी पोलीस ज्या सतर्कतेने आणि आक्रमकपणे काम करतात तशाच प्रकारे आता अमली पदार्थांचा नायनाट करण्यासाठी पोलिसांना काम करावे लागणार असल्याचे वळसे-पाटील म्हणाले. त्यासाठी शाळा महाविद्यालयाच्या अवती-भवतीही पोलिसांना नजर रोखावी लागेल, असे ते म्हणाले.

पोलिसांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. प्रत्येक पोलिसाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून पोलिसांचे संख्याबळ वाढवण्यासाठी १२ हजार पोलिसांच्या भरतीचे उद्दीष्ट सरकार समोर असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर पोलीस दलात भरती होणारा शिपाई उपनिरीक्षक म्हणूनच रिटायर्ड होईल, असेही त्यांनी सांगितले.

नागपूरच्या गुन्हेगारीकडे कटाक्ष टाकताना त्यांनी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालाकडे लक्ष वेधले. नागपूरचा क्राईम रेट कसा कमी करता येईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी विशद केली. गुन्हा घडल्यानंतर तपास करून प्रकरण न्यायप्रविष्ट करण्याऐवजी गुन्हा घडणारच नाही, याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पोलिसांवरील हल्ल्याचे प्रकार अतिशय गंभीर आहे. तसे करण्याची कोणी हिंमत करू नये यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत आणि त्यासाठी समाजात पोलिसांचा आदरयुक्त दरारा असण्याची गरज गृहमंत्र्यांनी विशद केली.

आदरयुक्त दरारा निर्माण करा

पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाला आदराची आणि न्यायाची वागणूक मिळाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. यासह कायदा आणि सुव्यवस्थेची घडी राखण्यासाठी तुम्ही दक्षता, पण एक काम करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा विधेयक संमत करू

महिला अत्याचारासंबंधित शक्ती कायदा विधेयक नागपूर अधिवेशनात संमत करण्याची तयारी राज्य सरकारने केली आहे. त्यासाठी संयुक्त निवड समितीच्या अहवालावर लवकरच चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: home minister Dilip Walse Patil on Central Intelligence And Investigative Agencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.