गृहमंत्र्यांच्या नागपुरातील धडाकेबाज कारवाईचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 12:53 AM2020-03-21T00:53:05+5:302020-03-21T00:55:28+5:30
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी होमटाऊनमध्ये गुरुवारी रात्री केलेल्या धडाकेबाज कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मॉल्स, हॉटेल, पानठेले बंद करण्याचे निर्देश राज्य सरकार व जिल्हा प्रशासनातर्फ जारी करण्यात आले असताना गुरुवारी शहरातील काही मंडळीनी आपली दुकानदारी बिनधास्तपणे सुरू ठेवली असल्याची तक्रार गृहमंत्री देशमुख यांच्याकडे काही सुजाण नागरिकांनी केली. देशमुख यांनी याची गंभीर दखल घेत लागलीच अशा प्रतिष्ठानांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोबत घेत धडक दिली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी होमटाऊनमध्ये गुरुवारी रात्री केलेल्या धडाकेबाज कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
गुरुवारी रात्री ७ च्या सुमारास देशमुख यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना रविभवन येथे बोलविले. देशमुख यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांसोबत सदर, अजनी आणि बजाजनगरात काही ठिकाणी छापे घातले. गृहमंत्र्यांचा ताफा बजाजनगरमध्ये सुजल सावजी भोजनालयात धडकला. यावेळी भोजनालय बंद असल्याचे मालकाने सांगितले. आतमध्ये पाहणी केली असता एक ग्राहक जेवताना दिसला तसेच किचनमध्ये मोठ्या प्रमाणात जेवण तयार होत असल्याचेही गृहमंत्री देशमुख यांना दिसून आले. त्यांनी याबाबत सुजलच्या संचालकाकडे विचारणा केली. समाधानकारकर उत्तर मिळत नसल्याचे पाहून गृहमंत्री देशमुख यांनी बजाजनगर पोलिसांना सुजल सावजीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, सुजल सावजीचे संचालक संजय गुप्ता यांच्याविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली भादंविच्या कलम १८८ अन्वये कारवाई केली.
सोशल मीडियावर व्हायरल
गृहमंत्र्यांच्या या कारवाईचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे लपूनछपून, आतल्या दाराने दुकानदारी करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले. गुरुवारी गृहमंत्र्यांनी केलेल्या या कारवाईचा परिणाम शुक्रवारी उपराजधानीत बघायला मिळाला. हॉटेल्स, मॉल, खाद्यपदार्थ विकणाऱ्यांपासून चहा टपरी आणि पान टपरीवाल्यांपर्यंत अनेकांनी आपली दुकानदारी बंद ठेवण्यातच धन्यता मानली. शुक्रवारी बिनबोभाटच काय लपूनछपून दुकानदारी करण्याचीही तसदी कुणी घेतली नाही.