कळमना डबलिंगमुळे होम प्लॅटफॉर्मचा उद्धार
By admin | Published: June 2, 2016 03:17 AM2016-06-02T03:17:06+5:302016-06-02T03:17:06+5:30
नागपूर-कळमना डबलिंगचा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर नागपूर रेल्वे स्थानकावरील होम प्लॅटफॉर्मचा उद्धार होईल,
बृजेश कुमार गुप्ता : रेल्वेच्या हमसफर सप्ताहाचा समारोप
नागपूर : नागपूर-कळमना डबलिंगचा प्रकल्प पूर्णत्वास आल्यानंतर नागपूर रेल्वे स्थानकावरील होम प्लॅटफॉर्मचा उद्धार होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हमसफर रेल्वे सप्ताहाच्या समारोपानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, कळमना डबलिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर होम प्लॅटफॉर्मवरून जास्तीतजास्त रेल्वेगाड्या चालविण्यात येतील.
नागपूर रेल्वे स्थानकावर पश्चिमेकडील भागात पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी तसेच रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थ भरपूर प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याबाबत इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशन वेगाने काम करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. अजनीत मेकॅनाईज्ड लॉन्ड्रीचा प्रस्ताव साकारण्यासाठी रिव्हाईज्ड प्लॅन मुख्यालयाला पाठविल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वेने ठेवलेल्या दरामुळे कंत्राटदार पुढे येत नसल्याचे त्यांनी सांगून हा विषय लवकरच मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले. इटारसी ते बल्लारशापर्यंत थर्ड लाईन आणि नागपूर ते वर्धादरम्यान चौथी लाईनचा प्रस्ताव मंजूर झाला असून थर्ड लाईनचे काम सुरू झाले आहे. नागपूर-सिकंदराबाद सेमी हायस्पीड कॉरिडोरचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या १३० किलोमीटर प्रति तास वेगाने ट्रायल घेतली जाऊ शकते. रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानंतर आवश्यक ते पाऊल उचलण्यात येणार आहे. मान्सूनपूर्व कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
डेमू, मेमू रेल्वेगाडी चालविण्याचा सध्या कोणताच प्रस्ताव नसून, रेल्वे हमसफर सप्ताहात मागील दोन वर्षांत विभागात केलेल्या कामांवर त्यांनी प्रकाश टाकला. (प्रतिनिधी)
अमृतसर, पुणे एसी रेल्वेगाडीचा पत्ता नाही
‘डीआरएम’ बृजेश कुमार गुप्ता यांनी सांगितले की, अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेली नागपूर-अमृतसर आणि नागपूर-पुणे एसी प्रीमियम रेल्वेगाडी नियमित चालविण्याबाबत सध्या काहीच माहिती नाही. रेल्वे मंत्रालयाकडून माहिती मिळाल्यानंतरच याबाबत काही सांगता येणार असल्याचे ते म्हणाले.
भरती प्रकरणात दोषींवर कारवाई करू
रेल्वे भरती प्रकरणात रेल्वे सुरक्षा दलाने मुंबई मुख्यालयाच्या माध्यमातून सीबीआयकडे माहिती पोहोचविली आहे. या प्रकरणातील दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगून, यात कोणालाच पाठीशी घालण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.