एसटीत बसताच होम क्वारंटाईनचा शिक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:07 AM2021-04-24T04:07:43+5:302021-04-24T04:07:43+5:30
नागपूर : लॉकडाऊनच्या काळातही उठसूठ एसटीने प्रवास करणाऱ्या लोकांच्या प्रवासावर निर्बंध येणार आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या कडक ...
नागपूर : लॉकडाऊनच्या काळातही उठसूठ एसटीने प्रवास करणाऱ्या लोकांच्या प्रवासावर निर्बंध येणार आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या कडक लॉकडाऊनच्या काळात बसताक्षणीच एसटीतून प्रवास करणाऱ्याच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारला जाणार आहे. शासकीय सेवा देणाऱ्या तसेच कारखाना किंवा फॅक्टरीमध्ये दैनंदिन कामासाठी जाणाऱ्यांना मात्र शिक्क्यातून सूट राहणार आहे.
राज्यातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर आलेल्या नव्या सूचनांप्रमाणे एसटी प्रवासात आता हे नवे नियम राहणार आहेत. महामंडळाची प्रवासीसेवा बंद राहणार नाही, मात्र मर्यादा ठेवून सुरू राहणार आहे. फक्त अत्यावश्यक काम असणाऱ्या लोकांसाठीच एसटी प्रवासाची मुभा असेल. प्रवास करणाऱ्या नागरिकांची यादी वाहकांना तयार करावी लागणार आहे. नोकरदार, आरोग्य सेवेतील कर्मचारी, पोलीस विभागातील कर्मचारी, फॅक्टरीमध्ये काम करणारे कामगार, अत्यावश्यक कामासाठी व वैद्यकीय उपचारासाठी प्रवास करणारे नागरिक तसेच अंत्यविधीसारख्या महत्त्वाच्या कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना आणि अडलेल्या परप्रांतीय कामगारांनाच एसटीने प्रवास करता येणार आहे.
यासंदर्भात ‘लोकमत’कडे माहिती देताना विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे म्हणाले, प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची नोंद वाहक ठेवणार आहे. प्रत्येकाचे ओळखपत्र तपासून आणि प्रवासाचे कारण समजून घेतल्यावरच बसमध्ये घेतले जाईल. अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना वगळून अन्य सर्वांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारण्याच्या सूचना वरिष्ठांकडून आल्या आहेत.
आंतरजिल्हा वाहतूक सुरू असली तरी अत्यंत मर्यादित बसफेऱ्या राहणार आहेत. तर जिल्ह्यातील नागरिकांचा महत्त्वाच्या कामात खोळंबा होऊ नये यासाठी जिल्हांतर्गत वाहतूक प्रामुख्याने कार्यालयीन वेळेत सुरू ठेवली जाणार आहे.
...
खासगी प्रवासी वाहतूकदारांवरही बंधने
नव्या सूचनानुसार खासगी प्रवासी वाहतूकदारांवरदेखील ही बंधने घालण्यात आली आहेत. त्यांनादेखील ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी बसमध्ये नेता येणार नाही. तसेच प्रवास करणाऱ्या व्यक्तींच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारणे, यादी ठेवणे, ती परिवहन विभागाकडे सादर करणे, बसेसचे सॅनिटायझेशन करणे, प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करणे, आजारी व्यक्ती आढळल्यास त्याला नजीकच्या रुग्णालयात पोहोचवून देणे, या बाबी त्यांच्यासाठीदेखील बंधनकारक करण्यात आल्या आहेत.
...