नागपुरातील होमगार्ड तीन महिन्यापासून मानधनाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:08 AM2021-02-24T04:08:39+5:302021-02-24T04:08:39+5:30
नागपूर : मानसेवी म्हणून काम करणारे आणि समाज व देशासाठी सेवा देणारे नागपूर जिल्ह्यातील होमगार्ड मात्र उपेक्षित आहेत. नागपूर ...
नागपूर : मानसेवी म्हणून काम करणारे आणि समाज व देशासाठी सेवा देणारे नागपूर जिल्ह्यातील होमगार्ड मात्र उपेक्षित आहेत. नागपूर महानगरातील होमगार्डचे मानधन डिसेंबरपासून तर ग्रामीणमधील होमगार्डचे मानधन नोव्हेंबरपासून थकीत आहेत. ना कामाची निश्चितता, ना वेळेवर मानधन, थकलेले विशेष सेवाकाळातील मानधन अशी अवस्था या मानसेवींची आहे.
नागपूर महानगर आणि नागपूर ग्रामीण अशा दोन भागात विभागलेल्या येथील जिल्हा होमगार्ड समादेशक कार्यालयांतर्गत २,७५० होमगार्ड आहेत. यात ५०० स्त्री आणि २,२०० पुरुष होमगार्ड आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये असलेल्या १६ तालुक्यात २२ सबयुनिट्स आहेत. म्हणायला जिल्हा एक असला तरी नागपूर महानगराचा व्याप मोठ्या जिल्ह्याएवढाच आहे. सोबत नागपूर ग्रामीणही जोडला असल्याने व्याप आणि कामाचा ताण मोठा आहे. असे असले तरी अलीकडे होमगार्ड्सना ड्युटी पूर्वीसारख्या मिळत नाही. महिन्यातून एक किंवा फारतर तीन दिवस ड्युटी मिळते. अनेकांना तर कामही मिळत नाही. असे असूनही मानधन वेळेवर मिळत नाही, ही अनेकांची खंत आहे. पूर्वी जिल्हा होमगार्ड समादेशकाचे पदही मानसेवी होते. मात्र तीन वर्षांपूर्वी ही जबाबदारी अप्पर पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे आली आहे. आपल्या दैनंदिन कामाचा आणि जबाबदारीचा व्याप सांभाळून त्यांना होमगार्ड समादेशक पदाला न्याय द्यावा लागतो.
...
बॉक्स
महिन्याला मिळते तीन दिवस काम
महिन्याला किती दिवस काम मिळेल याची अनिश्चितता आहे. कधी कधी एक ते तीन दिवस काम मिळते, मात्र कधी कधी कामच मिळत नाही. कामाचे तास आणि कर्तव्यभत्ता मिळून ६७० रुपये मिळतात. तीन दिवसाच्या ड्युटीचे महिन्याला १९०० रुपये मिळत असले तरी केवळ मानसेवी म्हणून अनेक जण समाज आणि देशासाठी सेवा देत आहेत.
...
कोट
कोविडच्या काळातील मानधनाचा मुद्दा निकालात निघाला आहे. नागपूर ग्रामीणमधील मानधन थकीत आहे. अनुदान आल्यावर सर्वांचे थकीत मानधन दिले जाईल. लवकरच आढावा घेणार आहे. त्यानंतर सर्व त्रुटी दूर केल्या जातील.
- राहुल माकणीकर, होमगार्ड समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक (नागपूर ग्रामीण)
...
कोट
पूर्वीचे मानधन मिळाले नाही. कोविड काळातील ९० रुपयाचा साप्ताहिक भत्ता मिळालेला नाही. चालू बंदोबस्ताचे मानधन बाकी आहे. आम्ही मानसेवी म्हणून काम करतो. वेळेवर भत्ते आणि मानधन देऊन सरकारने आमच्या सेवेचा सन्मान राखावा.
- खेमचंद म्हस्के
...
कोट
काम करूनही वेळेवर मानधन मिळत नाही. महिन्याचे काम किती दिवस मिळणार याची निश्चितता नाही. २०२० मधील परीक्षा काळातील सेवेचे मानधन अद्यापही मिळालेले नाही. आमच्या ड्युटीबद्दलही अनिश्चितता असल्याने महिन्यातून एक ते तीन दिवसाचेच काम मिळते.
- राहुल इखार
...
कोट
डिसेंबर-२०२० पासूनचे आमचे मानधन थकीत आहे. कोरोनाच्या काळामध्ये १८० दिवस काम केले, मात्र त्याचे मानधन अजूनही मिळालेले नाही. महिन्याला जेमतेम एक ड्युटी मिळते, कधी कधी तर मिळतही नाही.
प्रवीण पनवरे
...
जिल्ह्यातील होमगार्ड्सची संख्या - २,७५०
महिन्याचे मानधन थकीत - ३
...