होमहवन, दुर्गा पाठ व अखंड ज्योत
By admin | Published: September 29, 2014 01:04 AM2014-09-29T01:04:14+5:302014-09-29T01:04:14+5:30
शहरात ठिकठिकाणी नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. अनेक मंदिरांमध्ये अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात येत आहे. मंडळांनी ध्वजपूजा, दुर्गापाठ, होमहवन व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
नागपूर : शहरात ठिकठिकाणी नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे. अनेक मंदिरांमध्ये अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात येत आहे. मंडळांनी ध्वजपूजा, दुर्गापाठ, होमहवन व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
पश्चिम नागपूर नागरिक संघ
पश्चिम नागपूर नागरिक संघातर्फे रामनगरातील श्रीराम मंदिरात १००१ अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्यात आल्या आहेत. ज्योतीच्या आरासचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. इतरही भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक प्रवीण महाजन, मुकुंद सरमुकदम, वैभव नारखेडे, विशाल उमाळकर, नितीन अंधारे, अजय डबीर, विनोद जोशी, राजेंद्र पाठक, किरण देवपुजारी, जयंत आपटे, राजीव काळेले यांनी केले आहे.
माँ तुळजा भवानी देवस्थान
मनीषनगरातील देवस्थानमध्ये उत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये २९ सप्टेंबर ते ७ आॅक्टोबरदरम्यान रोज सकाळी आरती, श्रीमद्भागवतपुराण, भजन, रामलीला यासह मुलांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. ३ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता दशहरा भोजनदान कार्यक्रम पत्रकार भवन येथे होईल. ७ आॅक्टोबर रोजी उत्सवादरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण, भजनमंडळ व देवस्थानच्या सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर रामलीलेचा समारोप, कोजगिरी पौर्णिमेचा कार्यक्रम होईल. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल.
तुळजाभवानी देवस्थान पंचकमिटी
पंचकमिटीतर्फे विश्वकर्मानगर येथे २९ ला देवीचे जागरण, ३० ला अंताक्षरी, १ आॅक्टोबर रोजी प्रवचन, २ रोजी सकाळी ८ वाजता महाष्टमी महापूजा, होमहवन, ३ रोजी सुवर्ण वितरण व पानसुपारी आणि ५ रोजी सायंकाळी ८ वाजता महाप्रसाद वितरण होणार आहे.
श्री गणेश मंदिर टेकडी
उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. रोज सायंकाळी ७.३० वाजता गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. रोज दुपारी १२.३०च्या आरतीनंतर साबुदाणा खिचडी, शिरा व दह्याच्या प्रसादाचे वितरण करण्यात येत आहे, याचा लाभ भक्तांनी घ्यावा, असे आवाहन लखीचंद ढोबळे, पुंडलिक जौंजाळ, के.सी. गांधी, मधुकरराव धवड, एस.बी. कुळकर्णी व माधव कोहळे यांनी केले. (प्रतिनिधी)