कोरोनाच्या शंकेमुळे नागपुरात घराघरात अस्वस्थता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 12:47 AM2020-08-07T00:47:27+5:302020-08-07T00:48:42+5:30
रोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५० वरून ५५० वर पोहचली आहे. वसाहतीत रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे असताना ढगाळ वातावरण व पावसामुळे व्हायरल रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरोना तर नसेल ना, या शंकेने घराघरात अस्वस्थता दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५० वरून ५५० वर पोहचली आहे. वसाहतीत रुग्ण आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे असताना ढगाळ वातावरण व पावसामुळे व्हायरल रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. कोरोना तर नसेल ना, या शंकेने घराघरात अस्वस्थता दिसून येत आहे. परिणामी, स्वत:हून कोविड तपासणीचे प्रमाण वाढले आहे. खासगी प्रयोगशाळेत गेल्या पाच दिवसांत २००वर कोविड चाचण्या झाल्या आहेत.
जिल्हात मार्च महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाली असली तरी सर्वाधिक रुग्ण व मृत्यूची नोंद जुलै महिन्यात झाली. ३,८६७ रुग्ण तर १०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रुग्णसंख्येचा विक्रम झाला. बाधितांचा आकडा ५५८वर पोहचला. लोकांमध्ये कोरोनाविषयी असलेली दहशत आणखी वाढली. यातच कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या; परंतु लक्षणे नसलेल्यांना होम आयसोलेशन करण्याचा निर्णय घेतल्याने वसाहतीत किंवा घराशेजारी पॉझिटिव्ह रुग्ण असल्याच्या भीतीने भर टाकली आहे. दरम्यान, काही दिवसांपासून ढगाळ वातावरण व पावसामुळे व्हायरलचे रुग्ण वाढले आहेत. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसून येऊ लागल्याने प्रचंड दहशतीत लोक आहेत. काही डॉक्टरांकडे जाऊन खात्री करून घेत आहेत, काही स्वत:हून औषधी घेत आहेत, तर काही थेट खासगी लॅबमध्ये जाऊन कोविडची चाचणी करून घेत असल्याचे चित्र आहे. परंतु व्हायरल जरी असला तरी घरातल्या घरात फिजिकल डिस्टन्सिंग पाळायचे कसे, बारा तास मास्क बांधून राहावे कसे, असे अनेक प्रश्न सामान्यांना भेडसावत आहेत.
ताप, सर्दी, खोकल्याच्या औषधांना मागणी
जुलै व ऑगस्ट महिन्यात व्हायरलचे रुग्ण वाढतातच. एरवी या आजारावर डॉक्टर सहज औषधी देत होते, परंतु आता ही लक्षणे सांगताच काही डॉक्टर कोविड तपासणी करण्यास सांगत आहेत. मात्र काही रुग्ण कोविड पॉझिटिव्ह येऊ या भीतीने तपासणी न करता औषधी दुकानातून ताप, सर्दी व खोकल्यावरील औषधांची मागणी करताना दिसून येत आहेत. विशेषत: पॅरासिटामॉल, अझथ्रिमायसिन अशा औषधांची प्रचंड मागणी वाढली आहे. यावर औषध विक्रेत्यांनी विना प्रिस्क्रिप्शन औषधी न देण्याचा निर्णय घेला आहे.
गरम पाणी, वाफेच्या यंत्रांची विक्रीही वाढली
कोरोनाला दूर ठेवणारा सल्ल्यांचा व्हॉॅट्सअॅप व सोशल मीडियावर धुरळा उडाला आहे. यात गरम पाणी पिण्याकडे व दिवसातून तीनवेळा वाफ घेण्याच्या सल्ल्यांकडे लोकांचा कल वाढला आहे. परिणामी, गरम पाणी करण्याची किटली आणि वाफ देण्याच्या यंत्राची विक्री काही पटींनी वाढली आहे.