होमिओपॅथीमुळे दुर्धर आजार होतात बरे : होमिओपॅथी तज्ज्ञांचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 10:48 PM2019-03-04T22:48:50+5:302019-03-04T22:49:53+5:30
होमिओपॅथी उपचारपद्धती मनोरचना व मनोकार्याशी जवळीक साधते. रुग्णाच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करते. त्याच्या वर्तणूक, वागणूक व व्यक्तिमत्त्वामधील सूक्ष्म बदल अनुभवून योग्य औषधांची निवड करते. यामुळे ही ‘पॅथी’ आजाराला बरे करीत नाही तर आजारी रुग्णाला बरे करते. हृदयविकार, वंध्यत्व, मानसिक आजार, अस्थमा, त्वचारोग यासारख्या असंख्य रुग्णांना होमिओपॅथीद्वारे बरे करण्यात आले आहे, असा सूर होमिओपॅथी तज्ज्ञांचा होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : होमिओपॅथी उपचारपद्धती मनोरचना व मनोकार्याशी जवळीक साधते. रुग्णाच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करते. त्याच्या वर्तणूक, वागणूक व व्यक्तिमत्त्वामधील सूक्ष्म बदल अनुभवून योग्य औषधांची निवड करते. यामुळे ही ‘पॅथी’ आजाराला बरे करीत नाही तर आजारी रुग्णाला बरे करते. हृदयविकार, वंध्यत्व, मानसिक आजार, अस्थमा, त्वचारोग यासारख्या असंख्य रुग्णांना होमिओपॅथीद्वारे बरे करण्यात आले आहे, असा सूर होमिओपॅथी तज्ज्ञांचा होता.
ऑरेंज सिटी होमिओपॅथ्स असोसिएशनच्यावतीने आयोजित एक दिवसीय ‘होमिओ वोयेज-२०१९’ परिषदेत होमिओपॅथी तज्ज्ञ एकत्र असताना त्यांनी विविध आजारांवर व त्यांच्यावरील उपचारावर प्रकाश टाकला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेश रथकंठीवार, तर अध्यक्षपदी डॉ. मनीष पाटील उपस्थित होते.
परिषदेत, मुलांचा बदलता स्वभाव यावर डॉ. स्मिता अडकिने यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मुलांमध्ये वाढत असलेला चिडचिडेपणा, अभ्यासाची कमी झालेली आवड, एकाग्रता यावर होमिओपॅथीमध्ये उपलब्ध उपचारपद्धतीची माहिती दिली. डॉ. कुणाल अंबादे व डॉ. स्वप्निल घायवत यांनी अल्पावधीत विविध आजारांवर होमिओपॅथीच्या यशस्वी उपचाराची काही प्रकरणे सादर केलीत. डॉ. सचिन धमगये व डॉ. सोनल पंचभाई यांनी ‘अॅडव्हान्स पॅथालॉजिकल’ प्रकरणातही होमिओपॅथीमध्ये यशस्वी उपचार संभव असल्याचे सांगितले.
संचालन डॉ. गोपी मर्दिना व डॉ. नागसेन चव्हाण यांनी केले. आभार डॉ. रूपल कारवा यांनी मानले. परिषदेच्या आयोजनासाठी डॉ. अनिता मदनकर, डॉ. सुश्रुत सेलोकर, डॉ. रोहित मैत्रीकर, डॉ. कल्याणी दूरदुले, डॉ. प्राची चौकसे, डॉ. शिल्पा, डॉ. कुशल नारनवरे, डॉ. स्वाती शिवहरे, डॉ. प्रतीक्षा अंभारे, डॉ. अक्क्षा साबू, डॉ. शुभांगी राजूरकर, रुचिका मडावी, प्रियंका त्रिवेदी, शिवानी दशोत्तर, धनश्री यांनी विशेष परिश्रम घेतले.