गुन्हेगार भाडेकरूमुळे घरमालक पोलीस कोठडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2016 03:49 PM2016-05-10T15:49:54+5:302016-05-10T15:49:54+5:30

साधा सरळ वाटणारा तुमच्या भाडेकरूची तुम्ही शहानिशा केली काय, केली नसेल तर करून घ्या. त्याची संपूर्ण माहिती नजिकच्या पोलीस ठाण्यात द्या

Homeowner police custody due to criminal tenant | गुन्हेगार भाडेकरूमुळे घरमालक पोलीस कोठडीत

गुन्हेगार भाडेकरूमुळे घरमालक पोलीस कोठडीत

Next

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. १० - साधा सरळ वाटणारा तुमच्या भाडेकरूची तुम्ही शहानिशा केली काय, केली नसेल तर करून घ्या. त्याची संपूर्ण माहिती नजिकच्या पोलीस ठाण्यात द्या. तुम्ही हलगर्जीपणा दाखवला अन् तुमचा भाडेकरू एखादा गुन्हेगार निघाला तर तुमच्यावर नाहकच पोलीस कोठडीत जाण्याची वेळ येऊ शकते. होय, हुडकेश्वरमधील गौरी नामक एका घरमालकावर ही वेळ आली आहे.
 
घरमालक गौरी कॅटरर्सचे काम करतात. पाच महिन्यांपूर्वी त्यांनी आपल्या घरी एक भाडेकरू ठेवला. तो, पत्नी अन् मुली असे हे कुटुंब कुठून आले, काय करीत होते, सध्या काय करते, त्याची शहानिशा करण्याची घरमालक गौरी यांनी तसदी घेतली नाही. भाडेकरू कमी बोलतो, सरळ साधा वाटतो, अशी भावना झाल्याने त्यांनी त्याला आपले घर भाड्याने दिले. त्याची माहिती पोलीस ठाण्यात देण्याचीही तसदी घेतली नाही. 
 
अचानक दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरी सक्करदराचे  पोलीस उपनिरीक्षक निलेश धनराज पुरभे आपल्या पथकासह पोहचले. त्यांनी भाडेकरू  राहत असलेल्या घराची झडती घेतली. घर झडतीनंतर पोलिसांनी घरमालकाला ताब्यात घेतले. हुडकेश्वर ठाण्यात घरमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. 
 
त्यामुळे परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले.  घरमालकाला कोणत्या गुन्ह्यासाठी अटक झाली, त्याची शेजा-यांनी चौकशी केली असता त्यांच्याकडे राहणारा भाडेकरू कुख्यात गुन्हेगार असून तो पाच महिन्यांपासून फरार होता, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
 
‘तो’ वॉन्टेड होता
घरमालक गौरी यांनी ज्या भाडेकरूला पाच महिन्यांपूर्वी घर भाड्याने दिले तो अविनाश मनोहर नवरखेडे (वय ३०) हा अट्टल गुन्हेगार आहे. शास्त्री वार्ड हिंगणघाट (जि. वर्धा) येथील रहिवासी असलेल्या नवरखेडेविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, तो खुनाचा प्रयत्न करण्याच्या दोन गुन्ह्यात हिंगणघाट पोलिसांना वर्षभरापासून वॉन्टेड होता. तो इकडे तिकडे राहून पोलिसांना चकवित होता. त्याला भाड्याने घर दिल्यानंतर घरमालकाने पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे हा गुन्हेगार बिनधास्त नागपुरात राहू लागला. सक्करदरा पोलिसांच्या हाती लागल्यानंतर हा सर्व घटनाक्रम उघड झाला. 
 
 माहिती देणे बंधनकारक
एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जायचे. भाड्याची खोली घ्यायची. कट रचायचा आणि घातपात करून पळून जायचे, असे अनेक प्रकार विविध शहरात घडले आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी अन् गुन्हेगारांना कुठे आश्रय मिळू नये म्हणून सरकारने एक कायदा केला. त्यानुसार आपल्या घरी भाड्याने राहणा-या व्यक्तींची माहिती पोलीस ठाण्यात कळविणे घरमालकासाठी बंधनकारक करण्यात आले. ठिकठिकाणच्या पोलिसांकडून तशी जाहिरातही वेळोवेळी करण्यात आली. मात्र, अनेक घरमालक त्याकडे दुर्लक्ष करतात. गौरी यांनीही तसेच केले. त्याचमुळे कुख्यात गुन्हेगार नवरखेडे याला ५ महिने पोलिसांना गुंगारा देणे शक्य झाले आणि घरमालक गौरी यांच्यावर पोलीस कोठडीत जाण्याची वेळ आली. 

Web Title: Homeowner police custody due to criminal tenant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.