वेकोलितील स्फोटांमुळे घरांना हादरे : नागरिकांमध्ये भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 12:44 AM2020-12-30T00:44:00+5:302020-12-30T00:48:06+5:30
explosion in WCL वेकाेलिच्या ‘कामठी ओसीएम’ या खुल्या खाणीतून काेळसा काढण्यासाठी अधिक तीव्रतेचे स्फाेट घडवून आणले जातात. त्या स्फाेटांमुळे परिसरातील घरांना हादरे बसत असल्याने घरांचे नुकसान हाेण्याची शक्यता बळावली आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : शहरालगत असलेल्या वेकाेलिच्या ‘कामठी ओसीएम’ या खुल्या खाणीतून काेळसा काढण्यासाठी अधिक तीव्रतेचे स्फाेट घडवून आणले जातात. त्या स्फाेटांमुळे परिसरातील घरांना हादरे बसत असल्याने घरांचे नुकसान हाेण्याची शक्यता बळावली आहे. शिवाय, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण हाेत आहे. त्यामुळे या स्फाेटांची तीव्रता कमी करण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी वेकाेलिचे सब एरिया मॅनेजर एस. आर. तालनकर यांच्याकडे केली आहे.
या खुल्या खाणीलगत कन्हान शहरातील रायनगर, अशोकनगर, सुरेशनगर व पिपरी या नागरी वस्त्या आहेत. या खाणीतील दगड व खडक फाेडण्यासाठी तसेच आतून काेळसा काढण्यासाठी आत स्फाेट घडवून आणले जातात. वेकाेलि प्रशासनाने काही दिवसांपासून या स्फाेटांची तीव्रता वाढवली आहे. अधिक क्षमतेच्या स्फाेटांमुळे जमिनीला तसेच लगतच्या नागरी वस्त्यांमधील घरांना भूकंपागत हादरे बसत आहेत. त्यामुळे एकीकडे लहानग्यांसह माेठ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दुसरीकडे घरांच्या भिंतींना तडे जाऊन नुकसान हाेण्याची शक्यता बळावली आहे.
ही समस्या साेडविण्यासाठी या भागातील नागरिकांनी नुकतीच वेकाेलिचे सब एरिया मॅनेजर एस. आर. तालनकर यांची भेट घेऊन चर्चा केली आणि स्फाेटाची तीव्रता कमी करण्याची मागणी केली. या चर्चेत वर्धराज पिल्ले, सुनील पिल्ले, भारत पगारे, छोटू राणे, उमेश पौनीकर आदी सहभागी झाले हाेते. दुसरीकडे, सुखलाल मडावी, किरण ठाकूर, हर्ष पाटील, मुकेश उइर्के, चंदन पाटील, अनिकेत सोनवाणे, आशिफ शेख यांनी पालिका प्रशासनामार्फत वेकाेलि अधिकाऱ्यांकडे निवेदन साेपविले आहे.
या खाणीत स्फाेट घडवून आणतेवेळी ‘कंट्राेल ब्लास्टिंग’ तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे स्फाेटांची तीव्रता अधिक वाटत असली तरी त्यामुळे नागरिकांचे काेणतेही नुकसान हाेणार नाही. शिवाय, नागरिकांनी मनात काेणतीही भीती बाळगू नये.
- एस. आर. तालनकर, सब एरिया मॅनेजर
कामठी ओसीएम (वेकाेलि)