मेट्रो रेल्वेसाठी खोवा मार्केटवर हातोडा

By Admin | Published: January 24, 2017 02:50 AM2017-01-24T02:50:45+5:302017-01-24T02:50:45+5:30

महापालिकेच्या बाजार विभागाने संत्रा मार्केट येथील खोवा बाजारातील मोडकळीस आलेल्या दुकानांचे

Honda on the Khowa Market for Metro Rail | मेट्रो रेल्वेसाठी खोवा मार्केटवर हातोडा

मेट्रो रेल्वेसाठी खोवा मार्केटवर हातोडा

googlenewsNext

विरोधामुळे कारवाई थांबविली : अधिकारी म्हणतात, महापालिकेची जागा तर दुकानदारांचा ट्रस्टची दुकाने असल्याचा दावा
नागपूर : महापालिकेच्या बाजार विभागाने संत्रा मार्केट येथील खोवा बाजारातील मोडकळीस आलेल्या दुकानांचे बांधकाम पाडण्याची कारवाई सोमवारी सुरू केली. परंतु काही दुकानांचे बांधकाम जेसीबीच्या साह्याने पाडल्यानंतर दुकानदारांनी जेसीबीच्या समोर येत कारवाईला तीव्र विरोध दर्शविला. तणाव निमांण झाल्याने पोलिसांना बोलवण्यात आले. परंतु त्यानंतरही विरोध कायम राहिल्याने पथकाला कारवाई थांबवावी लागली.
महापालिकेने खोवा बाजाराची ११ हजार चौरस फूट जागा मेट्रो रेल्वे स्टेशनसाठी दिली आहे. ही जागा महापालिकेच्या बाजार विभागाच्या मालकीची असल्याचा महापालिका अधिकाऱ्यांचा दावा आहे. बाजार विभागाने खोवा विक्रेत्यांना परवाने देऊन तीन महिन्यांच्या करारावर दुकाने भाडेपट्टीवर देण्यात आलेली आहेत. येथील दुकानांचे बांधकाम मोडकळीस आले आहे. त्यामुळे ही जागा मेट्रो रेल्वे स्टेशनला देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. स्टेशनच्या इमारतीत येथील व्यापाऱ्यांना दुकाने उपलब्ध केली जाणार आहेत. यासंदर्भात दुकानदारांना १८ जानेवारीला नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.
परंतु त्यानंतरही दुकानदारांनी दुकाने खाली केली नाही. त्यामुळे सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास अतिक्रमण विरोधी पथक संत्रा मार्केट येथे धडकले.
दुकानदारांना व फळ विक्रेत्यांना सामान बाहेर काढण्यासाठी दोन तासाची वेळ देण्यात आली होती. त्यानंतर कारवाईला सुरुवात करण्यात आली. परंतु चार दुकानांचे बांधकाम तोडल्यानंतर मोठ्या संख्येने दुकानदार जमा झाले. त्यांनी पथकाला घेराव घालून कारवाईला विरोध दर्शविल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पथकाला कारवाई अर्धवट सोडून परत यावे लागले. (प्रतिनिधी)

बाजार अधिकृत,
कोणताही वाद नाही
खोवा मार्के ट ९० वर्षांपासून सुरू आहे. बाजार विभागाचा हा अधिकृत बाजार आहे. येथील दुकानदारांना परवाने देण्यात आले आहेत. महापालिका त्यांच्याकडून भाडेपट्टी वसूल करते. महापालिका प्रशासनाने ही जागा मेट्रो रेल्वेला दिली आहे. येथील दुकानदारांना मेट्रो रेल्वे स्टेशनमध्ये दुकाने उपलब्ध करण्यात येतील. या जागेचा मंदिर ट्रस्टशी काहीही संबंध नसून, जागेबाबत न्यायालयात दावा प्रलंबित नाही.
एन.बी.भोवते अधीक्षक, बाजार विभाग

जागा ट्रस्टची; मनपाची कारवाई बेकायदेशीर
खोवा बाजारातील फक्त एका ट्रॅव्हल्सवाल्याला महापालिकेने नोटीस बजावली आहे. खोवा मार्के ट महापालिका स्थापन होण्यापूर्वीचे आहे. ही जमीन दुर्गा माता मंदिर ट्रस्टच्या मालकीची आहे. महापालिका व ट्रस्ट यांच्यात जमिनीबाबतचा वाद सुरू असून, हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. परंतु न्यायालयात निर्णय होण्यापूर्वीच महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. दुकानदारांना बेरोजगार केले जात आहे, असा आरोप करून दुकाने हटविण्यापूर्वी व्यापाऱ्यांना पर्यायी जागा उपलब्ध करावी, अशी मागणी खोवा व्यापाऱ्यांनी केली आहे.

Web Title: Honda on the Khowa Market for Metro Rail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.