सुरक्षारक्षकांची इमानदारी...तब्बल २३ लाखांची बॅग केली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 10:42 PM2020-12-15T22:42:14+5:302020-12-15T22:48:28+5:30

Honest security guard नोटाने खच्चून भरलेली बॅग पाहून जराही विचलित न होता. प्रामाणिकपणे ती पोलिसांकडे नेऊन देणारे युवराज सदाशिव चामट, शुभम संजय हरडे, सनी विजय येवले आणि अतुल गणेशराव चतुरकर या चार सुरक्षा रक्षकांनी प्रामाणिकपणा पुन्हा जिवंत असल्याचे अधोरेखित केले आहे.

Honesty of the security guards ... returned the bag of 23 lakhs | सुरक्षारक्षकांची इमानदारी...तब्बल २३ लाखांची बॅग केली परत

सुरक्षारक्षकांची इमानदारी...तब्बल २३ लाखांची बॅग केली परत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - वेळ सायंकाळी ६ ची. वर्दळीच्या मुंजे चौकात नेहमीप्रमाणे नागरिकांची मोठी गर्दी. प्रत्येक जणाची धावपळ. अशात बराच वेळेपासून एक बॅग बेवारस अवस्थेत पडून असते. बॅग मध्ये काय असावे या प्रश्नाने आजूबाजूच्यांमध्ये कुजबूज सुरू होते. बॉम्ब तर नसावा... हा प्रश्नही धडकी भरवून जातो. त्यामुळे सुरक्षित अंतर राखत त्या भागातील ऑटोवाले, टपरीवाले बॅगकडे नजर टाकतात. परंतू ती उचलून बघण्याचे धाडस कुणी करत नाही.

एवढ्यात एटीएममध्ये रोकड जमा करणारे सीएमएस कंपनीचे चार सुरक्षा रक्षक तेथे पोहचतात. थेट बॅग उचलतात अन् पाहतात तर बॅगमध्ये नोटा खचाखच भरलेल्या. बॅगेत नोटा भरून असल्याचे कळताच गर्दी सैरभैर होते. आपण हाती घेतली असती तर. असेही अनेकांना मनोमन वाटून जाते. दरम्यान, सुरक्षा रक्षक थेट सीताबर्डी पोलीस ठाणे गाठतात. ठाणेदार अतुल सबनीस नोटांनी भरलेली बॅग ताब्यात घेऊन वरिष्ठांना कळवितात. लगेच पंचासमक्ष नोटा मोजणे सुरू होते. रात्री ९ वाजता बॅगमध्ये २३ लाख, ८९ हजार, ५८० रुपयांची रोकड आणि ८१ लाख, ९५ हजार, ४५ रुपयांचे वेगवेगळ्या जणांचे धनादेश असतात.

धनादेशावरून पत्ता

ही रोकड कुणाची याचा शोध धनादेशाच्या माध्यमातून पोलिसांनी लावला. लोकमत चौकाजवळ श्रीराम सेल्स नामक फर्मची ही रोकड असल्याचे स्पष्ट झाले. फर्मचे कर्मचारी दररोज वेगवेगळे व्यापारी आणि प्रतिष्ठानातून रोकड अन् धनादेश संकलित करतात अन् ते बँकेत जमा करतात. नेहमीप्रमाणे कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दिवसभर ही रोकड जमा केली आणि ते मुंजे चौकातून जात असताना दुचाकीवरून पैशाची बॅग खाली पडली. ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर शोधाशोध करू लागले. मात्र, सुदैवाने ही बॅग प्रामाणिक सुरक्षा रक्षकांच्या हाती लागली.

त्यांचा सत्कार होणार

नोटाने खच्चून भरलेली बॅग पाहून जराही विचलित न होता. प्रामाणिकपणे ती पोलिसांकडे नेऊन देणारे युवराज सदाशिव चामट, शुभम संजय हरडे, सनी विजय येवले आणि अतुल गणेशराव चतुरकर या चार सुरक्षा रक्षकांनी प्रामाणिकपणा पुन्हा जिवंत असल्याचे अधोरेखित केले आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते मंगळवारी त्यांचा सत्कार केला जाणार असल्याचे सीताबर्डी पोलिसांनी सांगितले आहे.

Web Title: Honesty of the security guards ... returned the bag of 23 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर