व्हाईस रेकॉर्डिंगसाठी हनीसिंगचा नकार

By admin | Published: March 2, 2015 02:33 AM2015-03-02T02:33:03+5:302015-03-02T02:33:03+5:30

अश्लील गाणी गाण्याचा आरोप असलेला पंजाबी रॅप गायक हिरदेशसिंग सरबजितसिंग ऊर्फ यो यो हनीसिंगने रविवारी पाचपावली पोलीस ठाण्यात हजेरी लावली.

Honey Singh's denial for voice recordings | व्हाईस रेकॉर्डिंगसाठी हनीसिंगचा नकार

व्हाईस रेकॉर्डिंगसाठी हनीसिंगचा नकार

Next

नागपूर : अश्लील गाणी गाण्याचा आरोप असलेला पंजाबी रॅप गायक हिरदेशसिंग सरबजितसिंग ऊर्फ यो यो हनीसिंगने रविवारी पाचपावली पोलीस ठाण्यात हजेरी लावली. पण स्वत:हून व्हाईस रेकॉर्डिंगची परवानगी देण्यास नकार दिला. यामुळे पोलिसांचा हनीसिंगला बोलाविण्याचा मूळ उद्देशच पूर्ण होऊ शकला नाही.
व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंग व अन्य पंजाबी रॅप गायक आदित्य पी.पी. सिंग ऊर्फ बादशाह यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी दोघांनीही सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. दरम्यान, सत्र न्यायालयाच्या आदेशामुळे दोघांनीही पाचपावली पोलीस ठाण्यात उपस्थित राहून बयान नोंदविले होते. यानंतर पोलिसांनी सत्र न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून अटकपूर्व जामीन अर्ज खारीज झाल्यास दोघेही चौकशीस सहकार्य करणार नाही, अशी भीती व्यक्त केली. यामुळे १६ जानेवारी रोजी सत्र न्यायालयाने दोघांनाही त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील अंतिम सुनावणीच्या तारखेस व्यक्तिश: उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. याविरुद्ध त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी अर्ज दाखल करून पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली होती.
ही बाब लक्षात घेता उच्च न्यायालयाने दोघांनीही २ मार्च रोजी सकाळी ११ वाजता व तपास अधिकाऱ्याला आवश्यक तेव्हा पाचपावली पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या अटीवर सत्र न्यायालयाचा वादग्रस्त आदेश रद्द केला होता. तसेच पोलिसांनी कायद्यानुसार व दोघेही स्वत:हून तयार असतील तेव्हाच व्हाईस रेकॉर्डिंग करावे, असे स्पष्ट केले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हनीसिंग निर्धारित तारखेच्या एक दिवस आधीच तपास अधिकाऱ्यांसमक्ष हजर झाला. (प्रतिनिधी)

पोलिसांना सहकार्य केल्याचा दावा
हनीसिंगने पोलिसांना पूर्ण सहकार्य केले. अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली, असा दावा अ‍ॅड. अतुल पांडे (हनीसिंगचे वकील) यांनी केला. याशिवाय त्यांनी व्हाईस रेकॉर्डिंगसंदर्भातील प्रश्नाचाही खुलासा केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पोलिसांना कुणालाही व्हाईस रेकॉर्डिंग देण्याची बळजबरी करता येत नाही. पोलिसांना हा अधिकार नाही. संबंधित व्यक्ती स्वत:हून तयार असेल तरच व्हाईस रेकॉर्डिंग घेता येते, अशी माहिती अ‍ॅड. पांडे यांनी दिली.
बादशाह आज येण्याची शक्यता
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बादशाहला कोणत्याही परिस्थितीत उद्या, सोमवारी पाचपावली पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे लागणार आहे. अन्यथा त्याला न्यायालय अवमाननेच्या कारवाईस सामोरे जावे लागेल.
अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी
हनीसिंग व बादशाह यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या, सोमवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे. दोघांनाही यापूर्वीच सशर्त तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाऊ नये, तपासाकरिता आवश्यक तेव्हा पोलीस ठाण्यात उपस्थित राहावे, यासह विविध अटी न्यायालयाने ठेवल्या आहेत.
उच्च न्यायालयात मांडणार मुद्दा
४जब्बल यांनी हनीसिंग व बादशाह यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यासाठी उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ४ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्याचे वकील अ‍ॅड. रसपालसिंग रेणू हे हनीसिंगच्या व्हाईस रेकॉर्डिंगचा मुद्दा उच्च न्यायालयासमक्ष उपस्थित करणार आहेत. पोलिसांनी हायकोर्टाच्या दणक्यानंतरच दोघांविरुद्ध एफआयआर नोंदविला होता, हे उल्लेखनीय. हनीसिंग व बादशाहच्या अश्लील गाण्यांमुळे युवकांवर वाईट परिणाम होत आहे. समाजात असंस्कृत वातावरण निर्माण होत आहे, असे जब्बल यांचे म्हणणे आहे.

Web Title: Honey Singh's denial for voice recordings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.