मालेगाव प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान

By admin | Published: May 16, 2016 02:56 AM2016-05-16T02:56:42+5:302016-05-16T02:56:42+5:30

मालेगाव बॉम्बस्फोटात झालेल्या घडामोडीवर आपण बोलणार नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान आहे.

Honor of court decision in Malegaon case | मालेगाव प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान

मालेगाव प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान

Next

पोलीस महासंचालक दीक्षित : विधीतज्ज्ञांच्या सल्ल्याने पुढील कारवाई
नागपूर : मालेगाव बॉम्बस्फोटात झालेल्या घडामोडीवर आपण बोलणार नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान आहे. मात्र, या प्रकरणात राज्य पोलीस विधीतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार कारवाई करेल, अशी प्रतिक्रिया राज्याचे पोलीस महासंचालक (डीजी) प्रवीण दीक्षित यांनी नोंदविली.
हिंगणा, जुनी कामठी आणि कामठी पोलीस ठाणी पोलीस आयुक्तालयाला जोडण्यात आली. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस महासंचालक दीक्षित शनिवारपासून नागपुरात आहे. आज त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली.
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना मिळालेला दिलासा, अण्णा हजारेंना मिळालेली धमकी, जहाल नक्षलवादी रंजिताचे एन्काउंटर, डब्बा व्यापारात डी कंपनी, असे अनेक प्रश्न यावेळी पत्रकारांनी उपस्थित केले. काहींना दीक्षित यांनी सविस्तर उत्तर दिले. काहींना बगल दिली तर काही प्रश्नांवर त्यांनी थेट बोलण्याचे टाळले.

डब्बा व्यवहाराची सखोल चौकशी

नागपूर : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह आणि कर्नल पुरोहित यांच्याविरुद्ध सबळ पुरावे नसल्याच्या कारणावरून राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) त्यांच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत दाखल केलेले गुन्हे काढून घेण्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले आहे. एटीएसच्या चौकशीवर ठेवण्यात आलेला ठपका तसेच या अनुषंगाने निर्माण झालेल्या स्थितीवर पत्रकारांनी दीक्षित यांना विविध प्रश्न विचारले. त्यातील अनेक प्रश्नांचे उत्तर देण्याचे दीक्षित यांनी टाळले. 'न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान' आहे. आपण त्यावर काही बोलणार नाही. मात्र, या प्रकरणाच्या तपासातील त्रुटी आणि पुढील कारवाईसाठी विधी तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल. त्यानुसारच पुढील कारवाई करण्यात येईल, असे दीक्षित म्हणाले. या संबंधाने उपस्थित झालेल्या अन्य प्रश्नांना दीक्षित यांनी बगल दिली.
अण्णा हजारे यांना मिळालेल्या धमकीचा प्रश्न उपस्थित झाला असता, अण्णांना प्रभावी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. योग्य ती काळजी घेतली जात असून, चिंता करण्याचे कारण नसल्याचेही दीक्षित म्हणाले.
जहाल नक्षलवादी रंजिता हिला पोलिसांनी बनावट चकमकीत मारल्याचा आरोप होत आहे, याकडे लक्ष वेधले असता दीक्षित यांनी त्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले.पोलिसांशी झालेल्या चकमकीतच तिचा मृत्यू झाल्याचे सांगून नक्षलग्रस्त भागात पोलिसांचे काम अतिशय चांगले असल्याचा दावा त्यांनी केला. नक्षल भागातील पोलीस अत्याधुनिक शस्त्रांचा वापर करीत आहेत. या भागात उघडण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्रात लोकांची वर्दळ वाढली असून, लोकांचा पोलिसांवरील विश्वास वाढल्याने नक्षल चळवळीला घरघर लागल्याचे ते म्हणाले. गडचिरोलीतील पोलिसाच्या अपहरणाचा मुद्दा उपस्थित झाला असता, तो खासगी कारणामुळे कर्तव्यावर येत नव्हता. तो बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वत्र खळबळ उडवून देणाऱ्या डब्बा व्यापारात डी कंपनीचा सहभाग आहे काय, असा थेट प्रश्न पत्रकारांनी विचारला असता चौकशी सुरू असल्याने याबाबत आत्ताच काही बोलणे होणार नाही,असे ते म्हणाले.
अनेक वर्षांपासून डब्बा सुुरू आहे. पोलिसांकडे पाच महिन्यांपूर्वी तक्रार झाली त्यानंतरही कारवाईला विलंब झाला, याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, आर्थिक गुन्हेगारीत गुंतलेली मंडळी धूर्त असतात. ती आधीच आपल्या बचावाची तयारी करून असतात. त्यामुळे अशा गुन्ह्यात कारवाई करताना अनेक बाबींचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे बरेचदा कारवाईला उशीर होतो,असे ते म्हणाले. या प्रकरणात सखोल तपास करण्यात येईल आणि आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले. मोक्का लावलेले बाहेर येत आहे, हे निदर्शनास आणून दिले असता न्यायालयाच्या निर्णयावर बोलणे योग्य नाही, असे ते म्हणाले. मात्र, मोक्का लावण्याच्या प्रक्रियेत काही त्रुटी असल्यास त्या दूर केल्या जातील, अशी पुष्टीही दीक्षित यांनी जोडली.
चेन्नसॅचिंगच्या गुन्ह्यात यापूर्वी भादंविच्या ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला जात होता. यानंतर ३७९ (अ आणि ब)असा गंभीर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. मोकाट सुटलेल्या चेनस्रॅचर्सना आळा घालण्यात पोलिसांनी यश मिळवल्याचा दावाही त्यांनी केला. गेल्या सहा महिन्यात राज्यात चेनस्रॅचिंगचे ९०० गुन्हे कमी झाल्याचेही दीक्षित यांनी सांगितले. घरफोडीच्या गुन्ह्यांना कसा आळा घालणार, असा प्रश्न आला असता त्यांनी घरफोडी रोखण्यासाठी नागरिकांनी काय करावे, त्याबाबत विविध सूचना केल्या. यावेळी पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव, सहआयुक्त राजवर्धन, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे आणि विशेष महानिरीक्षक रवींद्र कदम उपस्थित होते. (प्रतिनिधी)

पावणेदोन लाख पोलीस मित्र
राज्य पोलीस आता वाहन चोरीच्या संबंधाने ई-अ‍ॅप सुरू करणार आहे. त्यानुसार वाहन चोरीची तक्रार नोंदवण्यासाठी संबंधितांना पोलीस ठाण्यात जाण्याची गरज पडणार नाही. या अ‍ॅपवरूनच तक्रार नोंदवू शकेल. ही तक्रार राज्यभरातील पोलिसांना दिसेल. त्यामुळे वाहनचोरीचा छडा तातडीने लागण्यास मदत होईल, असा आशावादही दीक्षित यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या मदतीसाठी शहर आणि ग्रामीण पोलिसांनी तयार केलेल्या अ‍ॅपला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही ते म्हणाले. राज्यात पोलिसांनी १ लाख, ७५ हजार पोलीस मित्र बनविले असून, नागरिकांचा विश्वास जिंकण्यात पोलिसांना यश मिळत आहे. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रण आणि गुन्ह्याचा तपास लावण्यातही यश मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. कुणाला ओळखपत्र देण्याची गरज नाही. मात्र. या पोलीस मित्रांसाठीही एक अ‍ॅप तयार करण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.

Web Title: Honor of court decision in Malegaon case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.