वयाच्या ८२ व्या वर्षी ‘डीएसस्सी’चा मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 10:15 AM2018-07-30T10:15:04+5:302018-07-30T10:15:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : साधारणत: निवृत्तीनंतर आपले कुटुंबीय व चौकट यापुरतेच अनेकांचे आयुष्य मर्यादित होते. मात्र काही जण आयुष्यात नेहमीच काहीतरी नवीन शिकण्याच्या जिद्दीने भारलेले असतात. त्यांच्यातील विद्यार्थी व संशोधक त्यांना स्वस्थ बसू देत नाही व यातूनच ते नवीन इतिहास घडवितात. उपराजधानीतील ८२ वर्षीय डॉ.आनंद भोळे यांनीदेखील अशीच प्रेरणादायी कामगिरी केली आहे. स्थापत्य अभियांत्रिकीतील मौलिक संशोधनासाठी त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून ‘डीएसस्सी’ (डॉक्टर आॅफ सायन्स) या पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये ‘डीएसस्सी’ घेणारे डॉ.भोळे हे देशातील पहिलेच प्रोफेसर ठरणार आहेत.
Þडॉ.भोळे यांनी आपल्या संशोधनातून ‘इलेक्ट्रीकल’ आणि ‘मेकॅनिकल’ या संकल्पनांचा उपयोग न करता भूजल शुद्ध करण्याचे संशोधन केले व त्यात त्यांना यशदेखील आले. स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. ‘सिम्पल अॅन्ड लो कॉस्ट वॉटर ट्रीटमेन्ट टेक्नॉलॉजी फॉर रुरल एरिया’ या विषयावर त्यांनी संशोधन सादर केले. त्यांचे ‘पेटन्ट्स’ व विविध शोधपत्रिका याच्यावर हे संशोधन आधारित होते. नोव्हेंबर महिन्यात विद्यापीठ त्यांना ‘डीएसस्सी’ प्रदान करणार आहे.
२५० तांत्रिक शोधपत्रिका प्रकाशित
नागपुरचेच रहिवासी असलेल्या डॉ.आनंद भोळे यांनी जबलपूर विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर १९५६ साली पर्यावरण विज्ञान या विषयात ‘रुडकी’ येथून ‘एमई’ केले. त्यांनी लंडन विद्यापीठात ‘पीएचडी’ पदवी मिळविली. यासाठी त्यांना ‘युनेस्को’ची ‘फेलोशीप’देखील मिळाली होती. १९६१ मध्ये ‘व्हीआरसीई’मध्ये (आताचे ‘व्हीएनआयटी’) ते प्राध्यापकपदावर रुजू झाले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला संशोधनाला वाहून घेतले व सुमारे २५० तांत्रिक शोधपत्रिका प्रकाशित केल्या. त्यांच्या नावावर १२ पेटंट्सची नोंदणी असून त्यांच्या मार्गदर्शनात २५ विद्यार्थ्यांनी ‘पीएचडी’ पूर्ण केली. विद्यापीठातदेखील अभ्यासमंडळ, ‘आरआरसी’ इत्यादी प्राधिकरणांवर ते कार्यरत होते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख
डॉ.आनंद भोळे यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील ओळख आहे. ‘वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशन’तर्फे ग्रामीण भागातील पाणीपुरवाठ व स्वच्छता या विषयावरील प्रारुप तयार करण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.