नागपूर जिल्ह्यातील दोन हजारांहून अधिक आशांचा सन्मान
By गणेश हुड | Published: August 6, 2024 09:04 PM2024-08-06T21:04:05+5:302024-08-06T21:04:16+5:30
जिल्हा परिषदेतर्फे आयोजन : आरोग्य केंद्रांना सोलर पॅनल व इनव्हर्टर उपलब्ध करणार
गणेश हूड, लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरोग्य यंत्रणेतील महत्वाचा दुवा असलेल्या आशा स्वयंसेविका तुटपुंज्या मानधनावर अहोरात्र सेवा देतात. त्यांनी केलेल्या परिश्रमाची दखल म्हणून जिल्हा परिषदेतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचा जिल्हा स्तरिय सन्मान सोहळा मंगळवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात उत्साहात पार पडला. दोन हजारांहून अधिक आशा स्वयसेविका , गटप्रवर्तक, तालुका समूह संघटक, जिल्हा समुह संघटक यांना सन्मानचिन्ह देवुन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कुंदा राऊत यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोकड्डे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला आमदार अनील देशमुख, माजी मंत्री सुनील केदार, कुंदा राऊत, मुख्यकार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, सभापती अवंतिका लेकुरवाळे, प्रविण जोध ,राजकुमार कुसुंबे, मिलींद सुटे, जि.प. सदस्य संजय जगताप, सुभाष गुजरकर, दिनेश बंग, निलीमा उईके, अरुण हटवार, सलील देशमुख, कविता साखरवाडे, पुष्पा चाफले, मनिषा फेंडर, वंदना बालपांडे,प्रमिला दंडारे, ज्योती सिरसकर,दीक्षा मुलताईकर, देवानंद कोहळे, महेंद्र डोंगरे यांच्यासह पंचायत समित्यांचे सभापती व पं. स. सदस्य उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या सर्कलनिहाय आरोग्य शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची महत्वाची भूमिका बजावत आहेत. जि.प.च्या सर्व ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना तसेच ज्या उपकेंद्रात प्रसुती दर जास्त आहे. त्या उपकेंद्राना इनव्हर्टर उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती कुंदा राऊत यांनी यावेळी दिली. तसेच ज्या उपकेंद्रावर विद्युत देयके भरण्यास आर्थिक अडचन आहे. अशा ठिकाणी सोलर पॅनल उपलब्ध करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
मुक्ता कोकड्डे म्हणाल्या, आशा स्वयंसेविकांना माता व बाल संगोपन कार्यक्रमतंर्गतील कामे, किशोरवयीन आरोग्य कार्यक्रम, कुटुंब नियोजनाची कामे, पोषण आहार कामे, संसर्गजन्य आजाराची कामे, असंसर्गजन्य आजाराची कामे, व नाविण्यपुर्ण कामे अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत यशस्वीपणे पार पाडतात. सोम्या शर्मा यांनी आशा स्वंयसेविकाचे समस्यांचे निराकरण करण्यास कटीबध्द असल्याची ग्वाही दिली.