अल्पवयीन मुलेच ग्राहक, धरमपेठेतील हुक्का पार्लरवर धाड
By योगेश पांडे | Published: March 12, 2024 12:07 AM2024-03-12T00:07:45+5:302024-03-12T00:08:02+5:30
कारवाईच्या भीतीने चौधरीने ते तौहीदला भाड्याने दिले आहे.
नागपूर : अल्पवयीन मुलांना हुक्का पुरविणाऱ्या धरमपेठेतील क्युबा या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या एसएसबीने छापा टाकला आहे. पोलिसांनी संचालक प्रफुल्ल अशोक चौधरी (३८), त्याचा सहकारी प्रणय चंद्रशेखर महाजन (२४. तेलंगखेडी), सूरज संजय निखाडे (२१), तौहीद बशीर शेख (२२) आणि अझहर हुसेन खान (२१) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धरमपेठेतील गोतमारे कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावर चौधरी याचे हुक्का पार्लर आहे. चौधरी सुमारे दोन वर्षांपासून ते चालवत आहेत. यापूर्वीही पोलिसांनी तेथे कारवाई केली होती. कारवाईच्या भीतीने चौधरीने ते तौहीदला भाड्याने दिले आहे.
परिसरातील अल्पवयीन मुले या हुक्का पार्लरमध्ये हुक्का सेवन करण्यासाठी येतात. गोतमारे कॉम्प्लेक्समध्ये जाण्यासाठी एकच मार्ग आहे. यावरही लोखंडी रॉडचे गेट आहे. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी आरोपी गोतमारे संकुलातील कार्यालये सायंकाळी बंद झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराला बाहेरून कुलूप लावत. पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आरोपींनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. विश्वासू ग्राहक आल्यावरच आरोपी कुलूप उघडत असे. क्राइम ब्रँचच्या एसएसबीने रविवारी क्युबामध्ये धाट टाकली. पोलिसांना दोन अल्पवयीन मुले आणि इतर ग्राहक हुक्का ओढताना आढळले. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.