नागपुरात जुगार अड्ड्याच्या वादातून गुंडावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 00:16 IST2020-04-23T00:14:08+5:302020-04-23T00:16:17+5:30
जुगार अड्ड्यावरून झालेल्या वादातून दक्षिण नागपुरातील कुख्यात बंटी ठवरे याच्यावर त्याच्या विरोधकांनी हल्ला केला. ही घटना बुधवारी सकाळी भांडेप्लॉट चौकात घडली.

नागपुरात जुगार अड्ड्याच्या वादातून गुंडावर हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुगार अड्ड्यावरून झालेल्या वादातून दक्षिण नागपुरातील कुख्यात बंटी ठवरे याच्यावर त्याच्या विरोधकांनी हल्ला केला. ही घटना बुधवारी सकाळी भांडेप्लॉट चौकात घडली. गेल्या २४ तासात भांडेप्लॉट चौकात दोन घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.
बंटीच्या विरुद्ध हत्या, बलात्कार, अपहरण, हप्ता वसुलीसह अनेक प्रकरणात गुन्हे दाखल आहे. सूत्रांच्या माहितीनुसार तो सक्करदरा येथील श्यामबाग येथे जुगार अड्डासुद्धा चालवितो. यात बंटी व शुभम भागीदार आहे. चार महिन्यापासून जुगार अड्ड्यातील वाट्यावरून शुभम व नेहाल याचा बंटीसोबत वाद सुरू होता. ते बंटीला धडा शिकविण्याच्या तयारीत होते. मंगळवारी रात्री दोघांमध्ये वादही झाला. त्यामुळे आरोपी बंटीचा काटा काढण्याच्या तयारीत होते. बंटी बुधवारी सकाळी त्यांच्या हाती लागला. त्यांनी बंटीवर जीवघेणा हल्ला केला. भांडेप्लॉट चौकात मंगळवारी हरिदास सावरकर यांच्यावर हल्ला झाल्याने परिसरात दहशत पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर पोहचले. प्रकरण वाढेल या कारणाने जखमी बंटी तक्रार देण्यास नकार देत होता. ही घटना वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहीत झाल्याने सक्करदरा पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. शुभम सातपैसे याने भाऊ व साथीदाराच्या मदतीने एकाच कुटुंबातील तीन भावांची हत्या केली होती. त्यानंतर त्याची सक्करदरा पोलीस ठाण्याच्या परिसरात दहशत निर्माण झाली आहे. बंटी बदला घेण्यासाठी कुख्यात आहे. त्याच्याविरुद्ध हत्येचे पाच गुन्हे दाखल आहे. त्यामुळे आरोपींना त्याला संपवायचे होते. या हल्ल्यानंतर बंटीसुद्धा बदला घेण्याच्या भूमिकेत असल्याची माहिती आहे. यामुळे भविष्यात गँगवार भडकण्याची शक्यता आहे.