गुंडांची पोलिसांवर दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:08 AM2021-05-11T04:08:20+5:302021-05-11T04:08:20+5:30
पोलिस कर्मचाऱ्यांचा मोबाइल फोडला : कपिलनगरात तणाव लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावर गुन्हेगारांनी जोरदार दगडफेक ...
पोलिस कर्मचाऱ्यांचा मोबाइल फोडला : कपिलनगरात तणाव
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसावर गुन्हेगारांनी जोरदार दगडफेक केली. त्यामुळे एक पोलीस कर्मचारी जबर जखमी झाला. आरोपींनी पोलीस कर्मचाऱ्याचा मोबाइलही फोडला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी ही घटना घडली.
शेंडे नगरात सागर आणि सतीश पाल हे दोन गुन्हेगार राहतात. ते दोघे भाऊ असले तरी त्यांचे आपसात पटत नाही. घरगुती कारणावरून ते एकमेकांना तसेच आजूबाजूच्यांसोबत नेहमीच वाद घालतात. मारहाणही करतात. दोन आठवड्यांपूर्वी सागरने अशाच प्रकारे कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली होती. तक्रार मिळाल्यानंतर कपिलनगर पोलिसांनी त्याला अटक केली आणि दुसऱ्या दिवशी तो जामिनावर बाहेरही आला. रविवारी दुपारी २.४५ वाजता आरोपी प्रफुल्ल ऊर्फ दादू दमाहे आणि सतीश तसेच सागर वाद घालू लागले. त्याची माहिती कळताच पोलीस पथक तेथे पोहोचले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे साथीदार तेथे पोहोचले. आम्ही काय ते बघून घेतो, असे म्हणून आरोपींच्या साथीदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. मोठा गुन्हा होऊ शकतो हे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी आपल्या सहकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले. त्यामुळे पोलिसांचा विरोध करण्यासाठी आरोपींचे साथीदार कुणाल ऊर्फ कालू पाटील, वैभव ऊर्फ बबलू भैसारे, श्याम ऊर्फ छोटू विजय पांडे तसेच अन्य साथीदारांनी पोलिसांना गराडा घातला. सागरला पोलिसांच्या ताब्यातून सोडवून घेण्यासाठी जोरदार दगडफेक केली. यात जयशील नंदेश्वर नामक पोलीस कर्मचारी जखमी झाला. त्याला मारहाण करतानाच आरोपींनी त्याचा मोबाइल फोडला. या घटनेची माहिती कळताच आजूबाजूच्या परिसरातील पोलीस ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी आरोपी सागर आणि त्याच्या पाच साथीदारांना ताब्यात घेतले. सतीश पाल तसेच त्याचे साथीदार पसार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
---
कुख्यात दद्याची गुंडगिरी
दोघांवर हल्ला
नागपूर : कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ९.३० ला प्राणघातक हल्ल्याची घटना घडली.
दुचाकीवर स्टंट दाखवताना हटकले म्हणून कुख्यात गुंड रितीक ऊर्फ दद्या ऊर्फ जंगखाया विशाल नागदेवते आणि त्याच्या साथीदारांनी दोघांवर प्राणघातक हल्ला चढवला. यात दीपक सहारे आणि रवी कांबळे हे दोन तरुण जबर जखमी झाले.
रितिक ऊर्फ दद्या ऊर्फ जंगखाया नागदेवते (२२, समता नगर), ऋषी नागदेवते आणि ४ साथीदार या प्रकरणात आरोपी आहेत.
रविवारी रात्री दद्या समता नगरात मोटरसायकलवर स्टंटबाजी करत होता. त्यामुळे दीपक सहारे आणि रवी कांबळे या दोन तरुणांनी त्याला हटकले. छोटी मुले रस्त्यावर खेळतात. त्यामुळे दुचाकी हळू चालव, असे समजावून सांगितले. दद्या यामुळे संतप्त झाला. त्याने आपल्या साथीदारांना बोलावले आणि शस्त्राच्या धाकावर परिसरात दहशत निर्माण केली. दीपक तसेच रवीवर हल्ला करून दोघांना गंभीर जखमी केले आणि पळून गेले. माहिती कळताच कपिलनगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी प्राणघातक हल्ला करण्याच्या आरोपाखाली आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. दद्याला अटक करण्यात आली असून साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
---
दद्यामुळे नागरिक दहशतीत
रितिक ऊर्फ दद्या हा कुख्यात गुंड असून त्याच्याविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर पोलिसांनी एमपीडीएचीही कारवाई केली आहे. मात्र कारागृहातून बाहेर येताच तो गुन्हेगारीत सक्रिय होतो. त्याच्यामुळे या भागातील नागरिक दहशतीत असतात.