जगण्याची उमेद पण, रक्ताची नातीच साद देईनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:07 AM2021-07-31T04:07:59+5:302021-07-31T04:07:59+5:30
सुमेध वाघमारे नागपूर : देश स्तरावर ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ची योजना राबवून महिलांना सक्षम करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले ...
सुमेध वाघमारे
नागपूर : देश स्तरावर ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ची योजना राबवून महिलांना सक्षम करण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले जात आहेत; परंतु महिलांमध्ये वाढत असलेल्या मानसिक आजाराकडे व आजार बळावल्यावर कुटुंबच त्यांना नाकारत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात १६० महिला मानसिक आजारातून बऱ्या झाल्या आहेत. त्यांना जगण्याची उमेद गवसली आहे. परंतु, नातेवाईकांनी पाठ फिरवल्याने मनोरुग्णालयाच्या दगडी भिंतीत त्यांच्यावर जगण्याची वेळ आली आहे.
सामाजिक, आर्थिक कारणांमुळे मानसिक आरोग्याचे प्रमाण वाढत चालले आहे. यात महिला मनोरुग्णांची संख्या गंभीर दखल घेण्याइतपत वाढली आहे. तज्ज्ञाच्या मते, कुटुंब, नोकरी किंवा व्यवसाय अशा दुहेरी जबाबदाऱ्या पार पाडताना त्या कामाच्या ओझ्याखाली येतात. यातून आलेले नैराश्य, भीतीमुळे त्यांचे मानसिक स्तर कमकुवत होतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात दर पाच महिलांपैकी एक महिला मानसिक आजाराला बळी पडते. यामुळे पुरुषांच्या तुलनेत ६० टक्के महिलांमध्ये मानसिक आजार दिसून येतो. ही तफावत असण्यामागे आपल्याच लोकांकडून होणारे अमानवीय वर्तन, शरीरातील हार्माेन्स, संस्कृतीचा पगडा आणि लिंगभेद ही महत्त्वाची कारणे आहेत. प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचार घेणाऱ्यांमध्ये महिलांची संख्या वाढली आहे. सध्या भरती असलेल्या ४३१ मनोरुग्णांमध्ये महिलांची संख्या २१८, तर पुरुषांची संख्या २१३ आहे.
-२६५ जणांचे मनोरुग्णालयच झाले घर
मनोरुग्णालयात उपचारांनंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या २६५ वर पोहोचली आहे. यात १०५ पुरुष, तर १६० महिला आहेत. परंतु, यातील काहींना घरचा पत्ता नीट आठवत नसल्याने तर काहींच्या घरच्या पत्त्यावर संपर्क साधूनही त्यांचे नातेवाईक प्रतिसाद देत नसल्याने तर काही घेऊन जाण्यास स्पष्ट नकार देत असल्याने रुग्णालयाच्या चार भिंतीच्या त्यांना आयुष्य काढावे लागत आहे. यात २० वर्षांहून अधिक काळ रुग्णालयात असलेल्या महिलांची संख्या मोठी आहे.
‘हाफ वे होम’मधून पूनर्वसनाचा प्रयत्न
उपचारांनंतर बरे झालेल्या ज्या रुग्णांचे पत्ते मिळत नाही किंवा नातेवाईक घरी घेऊन जाण्यास तयार नाहीत, अशांना सन्मानाने जगता यावे, त्यांचे योग्य पद्धतीने पुनवर्सन व्हावे त्यांच्यासाठी टाटा ट्रस्टच्या मदतीने ‘हाफ वे होम सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. येथे त्यांना स्वयंरोजगाराचे धडे देऊन त्यांना त्याच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न होत आहे.
-डॉ. पुरुषोत्तम मडावी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय