हॉरिबल! धडकेत जखमी झालेल्याला कारमध्ये बसविले, पुढे पुलाखाली फेकले, उपचाराअभावी कामगाराचा मृत्यू

By योगेश पांडे | Updated: April 1, 2025 22:37 IST2025-04-01T22:36:59+5:302025-04-01T22:37:26+5:30

Nagpur Crime News: नागपुरात कारचालकाकडून असंवेनशीलतेचा कळस : उपचाराच्या बहाण्याने कारमध्ये बसविले

Horrible! The injured person was thrown under the bridge, the worker died due to lack of treatment in Nagpur accident | हॉरिबल! धडकेत जखमी झालेल्याला कारमध्ये बसविले, पुढे पुलाखाली फेकले, उपचाराअभावी कामगाराचा मृत्यू

हॉरिबल! धडकेत जखमी झालेल्याला कारमध्ये बसविले, पुढे पुलाखाली फेकले, उपचाराअभावी कामगाराचा मृत्यू

- योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुचाकीवरील कामगाराला धडक देऊन जखमी केल्यानंतर एका कारचालकाने असंवेदनशीलतेचा कळसच गाठला. जखमीला रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने कारमध्ये टाकले व काही अंतरावर पुलाखाली फेकून दिले. वेळेवर उपचार न मिळाल्याने कामगाराचा मृत्यू झाला. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री ही घटना घडली.

कृष्णा बुलसे (४५, अयोध्या नगर) असे मृतक कामगाराचे नाव आहे. बांधकाम कामगार असलेले रुपेश वाकळे आणि कृष्णा बुलके हे दोघेही गुमगाव येथे बांधकामाच्या ठिकाणी भेट द्यायला गेले होते. सोमवारी सायंकाळी आठ वाजता ते दुचाकीने परत जात होते. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटजवळ एका पांढऱ्या रंगाच्या भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात कृष्णा जखमी झाले व त्यांच्या डोक्याला मार बसला होता. तेथे नागरिकांची गर्दी जमल्याने कारचालकाने उपचाराच्या बहाण्याने कृष्णाला कारमध्ये टाकले. मात्र चिंचभुवन पुलाजवळ गेल्यावर त्याने कार खाली घेतली व कृष्णाला कारमधून फेकून दिले. त्यानंतर कारचालक तेथून फरार झाला.

दरम्यान रुपेशने पोलिसांना फोनवर झालेल्या अपघाताची माहिती दिली होती. पोलिसांनी शोधाशोध केली असता जखमी कृष्णा मेयो, मेडिकल, एम्स किंवा इतर कुठल्याही रुग्णालयात दाखल नसल्याची बाब समोर आली. पोलीस त्याचा शोध घेत असताना पहाटे चार वाजताच्या सुमारास चिंचभुवन पुलाखाली ते निपचित पडलेला आढळला. पोलिसांनी त्यांना इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने अखेरचा श्वास घेतला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी कारचालकाचा शोध सुरू केला आहे. त्यासाठी विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पडताळले जात आहे.

वेळेवर उपचार मिळाले असते तर वाचला असता जीव
कृष्णा यांच्या डोक्याला मोठी जखम झाली होती व ते वेदनांनी विव्हळत होते. त्यांना उपचार मिळणे गरजेचे असल्याने कारचालकावर विश्वास टाकत रुपेशने त्याला जाऊ दिले. मात्र कारचालकाने विश्वासघात केला. वेळेवर उपचार मिळाले असते तर कृष्णा यांचा जीव वाचला असता.

Web Title: Horrible! The injured person was thrown under the bridge, the worker died due to lack of treatment in Nagpur accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.