पत्नीशी झालेल्या भांडणाचे भीषण पर्यवसान : वडिलांनी केली दोन मुलांची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:52 PM2018-10-11T22:52:57+5:302018-10-11T22:54:47+5:30
दारू पिण्याच्या विषयावरून पत्नीसोबत सकाळी झालेल्या भांडणाचे पर्यवसान दारूड्या नवऱ्याने त्याच्या पोटच्या दोन चिमुकल्यांची विहिरीत फेकून हत्या करण्यात झाले. समाजनमन सुन्न करणारी ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, इसासनी -वाघधरा येथे गुरुवारी सकाळी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दारू पिण्याच्या विषयावरून पत्नीसोबत सकाळी झालेल्या भांडणाचे पर्यवसान दारूड्या नवऱ्याने त्याच्या पोटच्या दोन चिमुकल्यांची विहिरीत फेकून हत्या करण्यात झाले. समाजनमन सुन्न करणारी ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, इसासनी -वाघधरा येथे गुरुवारी सकाळी घडली. संतोष लक्ष्मण मेश्राम (वय ३१) असे नराधम पित्याचे नाव असून, तो हिंगणा मार्गावरील राजीवनगरात राहतो. त्याच्या निर्दयीपणाला बळी पडलेल्या मुलांची नावे हर्षकुमार (वय ६ वर्षे)आणि प्रिन्सकुमार (वय ४ वर्षे), अशी आहेत. दुपारी उघड झालेल्या या भयावह घटनेने परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी आरोपी संतोष मेश्रामला अटक केली आहे.
संतोष मेश्राम हा त्याची पत्नी सरिता मेश्राम (वय ३२) हर्षकुमार आणि प्रिन्सकुमार या दोन चिमुकल्यांसह वाघधरा येथे राहात होता. मनात येईल तर कामाला जायचे, नाही तर दारूच्या नशेत पडून राहायचे,अशा वृत्तीच्या संतोषने घरातील वातावरण अस्वस्थ केले होते. संसाराचा गाडा ओढण्यासाठी सरिता एमआयडीसीतील एका कंपनीत रोजंदारीवर काम करायची. संतोष दारूच्या व्यसनाच्या अधीन होता. भल्या सकाळीच तो दारू दुकानात जायचा. आज सकाळी ५.३० च्या सुमारास तो झोपेतून उठला आणि जवळ असलेले पैसे घेऊन दारू पिण्यासाठी निघून गेला. ६ च्या सुमारास तो टुन्न होऊन घरी परतला. तेव्हा सरिताने त्याला जाब विचारला. घरात खायला धान्य आणत नाही आणि दारू प्यायला भल्या सकाळी जातो, कसे होईल अशाने, असे तिने विचारले. त्यावरून पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. ते ऐकून झोपेतून उठलेली दोन्ही चिमुकली रडू लागली. यावेळी त्यांना संतोष दुकानात घेऊन गेला आणि दोघांना दोन बिस्किटचे पुडे घेऊन दिले. ८ वाजता घरी आल्यानंतर मुलांच्या हातात बिस्किटचे पुडे पाहून पत्नीने ते त्यांच्या हातून हिसकावून घेतले. त्यामुळे सरिता आणि संतोषचे पुन्हा कडाक्याचे भांडण झाले. तू मुलाला बिस्किटमध्ये विष घालून मारू शकतो,असा आरोप सरिताने लावला. त्यावरून हा वाद टोकाला गेला.
दरम्यान, नेहमीप्रमाणे सकाळी ९ वाजता कामावर जायचे असल्यामुळे सरिताने मुलांना तयार केले. त्यांना जेवू घातले आणि स्वत:चा टिफीन घेत या दोघांना मावशी (सरिताची बहीण) रंजिता हिच्या घरी नेऊन सोडले. तेथे मुलांचे कोडकौतुक करून सरिता कामावर निघून गेली. काही वेळेनंतर सरिताला रंजिताचा फोन आला. तू कशाला नवऱ्यासोबत भांडण केले, असे तिने विचारले. सरिताने तिला तुला कसे कळले, असे विचारले असता तिने संतोष रागात आपल्या घरी आला आणि दोन्ही मुलांना सोबत घेऊन गेला, असे सांगितले. ते ऐकून सरिताला काही तरी आक्रित घडणार असे संकेत मिळाले की काय, ती कामावरून लगेच घरी परतली. तेव्हा संतोष घरासमोर फिरत असल्याचे तिला दिसले. तिने त्यांना मुलांच्या बाबतीत विचारले तेव्हा त्याने काहीही सांगितले नाही. परिणामी दोघांचे रस्त्यावरच भांडण सुरू झाले. शेजाऱ्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे दोन बीट मार्शल तेथे पोहोचले. रस्त्यावरची गर्दी पाहून त्यांनी भांडण करणाऱ्या पती-पत्नीला पोलीस ठाण्यात नेले. सरिताने आपली दोन्ही मुले संतोषने कुठे नेऊन सोडली, त्यांचे काय झाले, ते पतीला विचारा, असे म्हटले. त्यामुळे पोलिसांनी संतोषला विचारपूस सुरू केली.
...अन् पोलिसही हादरले!
तो दारू पिऊन असल्याने काही सांगत नव्हता. त्याची दारू उतरावी म्हणून पोलिसांनी त्याला चहा पाजला. त्यानंतर पुन्हा विचारपूस केली. यानंतर संतोषने दिलेल्या माहितीने पोलिसही हादरले. दोन्ही मुलांना घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माधव नगरीतील एका पडक्या विहिरीत नेऊन फेकल्याचे तो म्हणाला. ते ऐकून पोलिसांनी लगेच त्याला विहिरीजवळ नेले. आतमध्ये एक जनावर पडून दिसले. मुले दिसत नव्हती. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर दोन चिमुकल्यांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
सरिताची हरविली शुद्ध
काही वेळेपूर्वीच लाडकौतुक केलेल्या मुलांचे मृतदेह पाहून सरिताने हंबरडा फोडला, नंतर ती बेशुद्ध पडली. तिला पोलिसांनी पाणी पाजून शुद्धीवर आणले. यावेळी तिची अवस्था पाहवली जात नव्हती. नवऱ्याच्या रूपात पोटच्या मुलाचा काळ बनलेल्या संतोषकडे तिने धाव घेतली. तिला महिला पोलिसांना कसेबसे आवरले. दरम्यान, या घटनेमुळे एमआयडीसी परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपी संतोषला अटक केली.