धंतोलीतील रुग्णालयांनी स्वत:च्या पर्किंग जागेवरच वाहने पार्क करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 10:53 PM2019-11-18T22:53:30+5:302019-11-18T22:55:02+5:30
धंतोली परिसरातील रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयात उपलब्ध पार्किंग जागेचा वापर फक्त वाहन पार्किंग करिताच करावा, इतर कुठल्याही प्रयोजनासाठी पार्किंग जागेचा वापर करू नये, अशी विनंती वाहतूक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी डॉक्टर व त्यांच्या प्रतिनिधींना केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धंतोली परिसरातील रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयात उपलब्ध पार्किंग जागेचा वापर फक्त वाहन पार्किंग करिताच करावा, इतर कुठल्याही प्रयोजनासाठी पार्किंग जागेचा वापर करू नये, अशी विनंती वाहतूक पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी डॉक्टर व त्यांच्या प्रतिनिधींना केली.
वाहतूक परिमंडळ सीताबर्डी नागपूर शहर हद्दीतील हॉस्पिटल हब झालेल्या धंतोली भगातील अनधिकृत पार्किंग पासून उद्भवत चाललेली वाहतूक समस्या लक्षात घेता. तसेच त्यासंबंधाने उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेसंदर्भात पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या आदेशान्वये सोमवारी वाहतूक विभाग (शहर)चे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी धंतोली परिसरातील हॉस्पिटल संचालक डॉक्टरांची सामान्य बैठक बोलावली होती.
तेव्हा त्यांनी उपरोक्त विनंती केली. या बैठकीत डॉ. आशा बंग, डॉ. उमेश महाजन, अमरितपाल सिंग, डॉ. शिल्पा वरंभे आदींह ४० डॉक्टर व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
धंतोली परिसरात येणारी वाहने व संबंधित वाहने रहदारीच्या मार्गावर पार्क करण्यस प्रवृत्त होणार नाहीत, त्यापासून स्थानिक रहिवाशांना सुध्दा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही. त्यामुळे हॉस्पिटलच्या पार्किंग जागेतच वाहने पार्क करायला लावणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. धंतोली भगातील हॉस्पिटलमध्ये नियमितपणे मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिका उपचारासाठी येतात. अशावेळी रुग्णवाहिका संबंधित हॉस्पिटलच्या समोरील रहदारीच्या मार्गावर उभी करण्यात येते. रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर संबंधित हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकांनी रुग्णवाहिका व त्यासोबत आलेल्या वाहनांचे पार्किंग हॉस्पिटल व्यवस्थापनाने नेमून दिलेल्या जागेवरच करवून घ्यावे, हॉस्पिटल प्रशासनाने त्यांना याबाबत अवगत करावे. शक्य असल्यास हॉस्पिटल प्रशासनाने त्यांच्या पार्किंग व्यवस्थेबाबत दर्शनीय भागात मार्गदर्शक फलक लावावेत, अशा सूचनाही करण्यात आल्या.
यावेळी डॉक्टरांनी महत्त्वपूर्ण सूचनाही केल्या. यात डॉ. रुपा बंग यांनी सुनील पान मंदिर ते आरती प्रोव्हिजन , भारुका भवन ते डॉ. पेंडसे कॉर्नर हे दोन्ही मार्ग दुहेरी वाहतुकीस अरुंद ठरत असून त्याठिकाणी काही प्रमाणात दुचाकी वाहनांचे पार्किंग होत असल्याने त्रास निर्माण होतो. डॉ. शिल्पा वरंभे यांनी धंतोलीतील पादचारी मार्गावर घाणीचे साम्राज्य पसरल्याकडे लक्ष वेधले.
सीताबर्डीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर यांनीसुद्धा यावेळी धंतोलीतील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.