रुग्णालयांना अतिरिक्त बेडसाठी २४ तासांत परवानगी मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:07 AM2021-04-14T04:07:46+5:302021-04-14T04:07:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘कोरोना’चा प्रकोप वाढल्याने रुग्णांना रुग्णालयांत बेडस्साठी अक्षरश: भटकावे लागत आहे. रुग्णांना तातडीने सेवा मिळावी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’चा प्रकोप वाढल्याने रुग्णांना रुग्णालयांत बेडस्साठी अक्षरश: भटकावे लागत आहे. रुग्णांना तातडीने सेवा मिळावी यासाठी अतिरिक्त बेडस्साठी अर्ज करणाऱ्या रुग्णालयांना २४ तासांत परवानगी देण्यात यावी, असे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिले. नागपूर महानगरपालिकेच्या कोरोना वॉर रूममध्ये महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, ड्रग्स डीलर असोसिएशन, तसेच सामाजिक आणि वैद्यकीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हे निर्देश दिले.
नागपूरला ऑक्सिजनची कमतरता भासू देणार नाही. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात ऑक्सिजन आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या टँकर्सची संख्या वाढविण्यासाठी काही खाजगी कंपन्यांशी बोलणे करून अतिरिक्त ऑक्सिजन पुरवठा मागविण्यात आला आहे, असे गडकरी यांनी यावेळी सांगितले. इंजेक्शन आणि औषधांची कमतरता भासू नये यासाठी ‘पेटंट ॲक्ट’मधील सेक्शन ८४ शिथिल करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र पाठविले असल्याची महिती त्यांनी दिली. इंजेक्शन आणि औषधांचे वितरण योग्य पद्धतीने करण्यासाठीच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.