उपराजधानीत लुटारूंचा हैदोस
By admin | Published: September 2, 2015 04:54 AM2015-09-02T04:54:59+5:302015-09-02T04:54:59+5:30
उपराजधानीतील विविध भागातील रस्त्यावर लुटारूंनी हैदोस घातला आहे. सोमवारी रात्री एका विद्यार्थिनीला चाकूचा
नागपूर : उपराजधानीतील विविध भागातील रस्त्यावर लुटारूंनी हैदोस घातला आहे. सोमवारी रात्री एका विद्यार्थिनीला चाकूचा धाक दाखवून जरीपटक्यात तिचे दागिने लुटण्यात आले. मंगळवारी सकाळी ५.३० पासूनच सक्रिय झालेल्या लुटारूंनी एका पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याकडून ४ लाखांची रोकड लुटली तर, तीन महिलांचे दागिने लुटले. उपराजधानीत पोलिसांची रात्रंदिवस गस्त असल्याचे दावे केले जात असताना लुटारूंनी या दाव्यांची खिल्ली उडवत पोलिसांची अक्षरश: दाणादाण उडवली आहे.
कुख्यात गुन्हेगार सहभागी ?
लुटारूंनी ज्या मोटरसायकलने ही लुटमार केली, त्याचा क्रमांक घटनास्थळावर एकाने आरोपीच्या दुचाकीचा क्रमांक टिपला. त्याचवेळी लकडगंजचा एक पोलीस शिपायी घटनास्थळी पोहचला. त्याने दिवटेला सोबत घेउन लुटारू ज्या दिशेने पळाले, त्या दिशेने शोधाशोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गंगाजमुनापासून आरोपी पसार झाले. दरम्यान, दिवटेच्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी नमूद मोटरसायकल क्रमांकाच्या आधारे मोटरसायकल मालकाचे घर गाठले. तेव्हा त्याने ही मोटरसायकल एका गुन्हेगाराला काही वेळेपुर्वी दिली होती, हे स्पष्ट झाले. पोलिसांनी नरेश रक्षिये याला शिवनगर परिसरात पकडले. त्याच्याकडून राजू नामक साथीदाराचे नाव मिळवले.
गणेशपेठ : सकाळी ६ ते ६.२० वाजता
इतवारी, जुना मोटार स्टॅड चौकाजवळ राहणाऱ्या ज्योती हेमंत खंडेलवार (वय ४८) मैत्रिणीच्या दुचाकीने दोसर भवन चौकाकडे जात होत्या. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत माहेश्वरी ट्रेडींग कंपनीच्या समोर (सेंट्रल एव्हेन्यू) एका दुचाकीस्वाराने खंडेलवार यांच्या गळ्यावर थाप मारून २० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. गणेशपेठ पोलिसांनी जबरीचोरीचा गुन्हा नोंदविला.
गणेशपेठ : सकाळी ६.४५ ते ७.३० वाजता
नंदनवनमधील आनंद पॅलेसमधील रहिवासी दिनेश रमेश वडेट्टीवार (वय ४५) हे पत्नी योगीतासह अॅक्टीव्हाने गणेश टेकडी येथून दर्शन घेऊन घरी जात होते. गणेशपेठ मधील गोदरेज आनंदम सिटीच्या गेटसमोर एका दुचाकीस्वाराने योगिता यांच्या गळ्यातील २० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. गणेशपेठ पोलिसांनी वडेट्टीवारच्या तक्रारीवरून जबरी चोरीची नोंद केली.
अंबाझरी : सकाळी ९.५ वाजता
मंगला विजय खैरकर (वय ४२, रा. कल्पनानगर, नारी ले आऊट, जरीपटका) शंकरनगरातील हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. रात्रपाळीची ड्युटी आॅटोपून त्या अॅक्टीव्हाने घराकडे जात होत्या. अंबाझरीतील लॉ कॉलेज चौक, साठे ज्वेलर्स जवळ एका दुचाकीस्वाराने त्यांच्या मंगला यांच्या गळ्यातील ४२ हजारांचा सोन्याचा गोफ हिसकावून नेला. अंबाझरी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.
सहा तासात चोरी, लुटमारीच्या पाच घटना
अनियंत्रित झालेल्या लुटारूंद्वारे चोरी, लुटमारीच्या पाच घटना घडल्या. चोरट्यांनी सर्वप्रथम मंगळवारी पहाटे ४.४० ते ५.१५ च्या सुमारास भीम चौकातील एमआयडी कॉलनीतील शरनदिपसिंग अवतारसिंग अरोरा (वय ४०) हे गुरुद्वारामध्ये प्रार्थनेला गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने, घड्याळ, एटीएम कार्ड, ड्रायव्हींग लायसेन्स तसेच रोख ५५ हजार असा एकूण १ लाख, १७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. जरीपटका पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदविला.