उपराजधानीत लुटारूंचा हैदोस
By admin | Published: October 28, 2016 02:43 AM2016-10-28T02:43:30+5:302016-10-28T02:43:30+5:30
दिवाळीच्या सणाची सर्वत्र धूमधाम सुरू असताना चोर-लुटारूंनी उपराजधानीत अक्षरश: हैदोस घातला.
प्रतापनगरात दारासमोर वृद्धाला लुटले : दागिने आणि रोकड लंपास
नागपूर : दिवाळीच्या सणाची सर्वत्र धूमधाम सुरू असताना चोर-लुटारूंनी उपराजधानीत अक्षरश: हैदोस घातला. गुरुवारी दिवसाढवळ्या एका वृद्धाच्या दारासमोरून ९० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून नेली तर, अनेक ठिकाणी लुटालूट, चोरी, घरफोडी करून खळबळ उडवून दिली.
पांडे लेआऊटमधील श्रीकृपा अपार्टमेंटमध्ये राहणारे रमेश सीताराम गिराडे (वय ६६) यांनी दिवाळीच्या निमित्ताने लॉकरमध्ये ठेवलेले दागिने काढून घरी आणण्यासाठी बँकेत गेले. सुरेंद्रनगरातील स्टेट बँकेच्या शाखेतून काढलेले ९० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ४५ हजारांची रोकड त्यांनी आपल्या जवळच्या बॅगमध्ये ठेवली. त्यानंतर दुपारी १.४५ वाजता ते दुचाकीने घराकडे परत आले. पार्किंगमध्ये दुचाकी ठेवल्यानंतर डिक्कीतून बॅग काढून ते पहिल्या माळ्यावर चढले. तेवढ्यात लाल रंगाची टी-शर्ट घातलेला एक आरोपी मोबाईलवर बोलत वर आला. त्याने आजूबाजूला कुणी नसल्याची खात्री केल्यानंतर गिराडे यांच्या हातातील बॅग हिसकावून घेतली अन् पळून गेला. आपल्या दारासमोर घडलेल्या या अनपेक्षित घटनेने हादरलेले गिराडे यांनी आरडाओरड केली. मात्र, शेजाऱ्यांना या घटनेची माहिती कळेपर्यंत आरोपी नजरेआड झाला होता. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. गिराडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. लुटारूचा शोध घेतला जात आहे.
विद्यानगरातील अंजना आशिष तलवार (वय ५३) या बुधवारी रात्र १०.२० वाजता कोराडी - सावनेर मार्गाने पतीच्या दुचाकीवर बसून जात होत्या. दुचाकीवर मागून वेगात आलेल्या दोन आरोपींनी तलवार यांची हॅण्डपर्स हिसकावून घेतली. पर्समध्ये रोख ९८०० रुपये तसेच मोबाईल आणि एटीएम कार्डसह २५ हजारांचा मुद्देमाल होता. तलवार दाम्पत्याने दिलेल्या तक्रारीवरून कोराडी ठाण्यातील महिला उपनिरीक्षक दराडे यांनी जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला.
या घटनेच्या तीन तासानंतर गणेशपेठच्या डालडा कंपनीसमोर राजू रामलू मंडलवार (वय ३१, रा. इंदिरानगर झोपडपट्टी) याला तीन आरोपींनी लुटले. राजू गुरुवारी पहाटे १.४५ वाजता काम आटोपून सायकलने घरी जात असताना त्याला तीन लुटारूंनी थांबविले. मारहाण करून त्याच्या खिशातील सहा हजार हिसकावून घेतले. या लुटमारीसोबतच गरीब राजू मंडलवारच्या घरातील दिवाळीचा आनंद लुटारूंनी हिरावून नेला आहे. गणेशपेठचे उपनिरीक्षक नन्नावरे यांनी जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.
अशीच घटना आज पहाटे ३ वाजता गणेशपेठेतच राममंदिराच्या बाजूला संत्रा मार्केट परिसरात घडली. भंडारा जिल्ह्यातील जुन्नड (ता. तुमसर) येथील राहुल दसाराम राणे (वय ३४) गुरुवारी पहाटे ३ च्या सुमारास बसस्थानकाकडे जात होते. आरोपी जुनेद आणि त्याच्या एका साथीदाराने राणे यांना रोखले आणि मारहाण करून त्यांच्याजवळचे ३ हजार ९०० रुपये लुटले. राणे यांनी तक्रार देताच पोलीस उपनिरीक्षक नन्नावरे आणि सहकाऱ्यांनी धावपळ करून आरोपी जुनेद तसेच हैदरला ताब्यात घेतले. या दोघांनी गुन्हा कबूल केला. त्यानंतर यापूर्वी डालडा कंपनीजवळ घडलेल्या घटनेतील फिर्यादी राजू मंडलवार यालाही आरोपींना दाखवण्यात आले. मात्र, आरोपी काळे हेल्मेट घालून अंधारात असल्यामुळे त्याने या आरोपींबाबत स्पष्ट ओळख पटविण्यास असमर्थता दर्शवली.(प्रतिनिधी)