नागपुरात महापौर बदलण्याची हॉट चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 11:03 AM2018-04-23T11:03:10+5:302018-04-23T11:03:19+5:30
नागपुरातील तापमानाचा पारा सातत्याने वर चढत असताना आता राजकीय पारा चढण्याचेही संकेत आहेत. महापालिकेच्या वर्तुळात महापौर बदलाच्या ‘हॉट’ चर्चेला उधाण आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरातील तापमानाचा पारा सातत्याने वर चढत असताना आता राजकीय पारा चढण्याचेही संकेत आहेत. महापालिकेच्या वर्तुळात महापौर बदलाच्या ‘हॉट’ चर्चेला उधाण आले आहे. सध्या नंदा जिचकार या महापौरपदी विराजमान असून त्यांचा वर्षभरापेक्षा अधिक काळ झाला आहे. मनपामध्ये महापौराचा कार्यकाळ अडीच वर्षाचा असतो. यापूर्वी अनिल सोले व प्रवीण दटके यांनी अडीच-अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. गेल्या काही दिवसात नंदा जिचकार यांच्याबाबत सत्ताधारी पक्षातच विरोधाचे सूर दिसून येत आहेत. ज्येष्ठ नगरसेवक सतीश होले यांनी मनपा सभागृहात शहरात जलसंकटासाठी महापौरांना दोषी ठरविले होते व त्यानंतर महिला नगरसेवकांमध्ये महापौर बदलाची चर्चा जोर धरत आहे. त्यामुळे जिचकार यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या पायउतार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नंदा जिचकार यांना महापौर पदावरून हटविण्याच्या मुद्यावर भाजपाचे मनपातील पदाधिकारी व ज्येष्ठ नेते दोन गटात विभागले आहेत. एका गटाला वाटते की, जिचकार यांना अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू द्यावा तर दुसरा गट नवीन महिला नगरसेविकेला संधी देण्याच्या बाजूने आहे. प्रशासनावर त्यांचा वचक नसल्याचा आरोप वारंवार लावण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी झालेल्या भाजपाच्या कोर कमिटीच्या बैठक ीत महापौरांबाबत चर्चा करण्यात आली होती. मात्र निर्णय होऊ शकला नाही. महत्त्वाचे म्हणजे उपमहापौरपदाचा कार्यकाळ हा सव्वा वर्षाचा असतो. त्यामुळे नव्या उपमहापौराचा शोध सुरू झाला आहे. सध्या उपमहापौरपदी हलबा समाजाचे दीपराज पार्डीकर विराजमान आहेत. त्यांच्या बदलासह महापौरांनाही बदलले जाईल का, याबाबत भाजपामध्ये खलबते सुरू असल्याचे बोलले जात आहे.