‘डीबीए’च्या आमसभेत निवडणुकीवरून वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 09:16 PM2018-07-07T21:16:53+5:302018-07-07T21:17:46+5:30
विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्यानंतरही निवडणूक घोषित केली जात नसल्याच्या मुद्यावरून जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या (डीबीए) आमसभेत जोरदार वादावादी झाली. निवडणुकीसाठी आग्रही असणाऱ्या सदस्यांनी सचिव अॅड. नितीन तेलगोटे यांना घेरून तत्काळ निवडणूक जाहीर करण्याची मागणी केली. अॅड. तेलगोटे यांनी निवडणूक का लांबली याचे स्पष्टीकरण देण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्यांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत कुणीच नव्हते. शेवटी तेलगोटे यांनी येत्या आॅक्टोबरमध्ये निवडणूक घेण्याचे जाहीर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विद्यमान कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्यानंतरही निवडणूक घोषित केली जात नसल्याच्या मुद्यावरून जिल्हा विधिज्ञ संघटनेच्या (डीबीए) आमसभेत जोरदार वादावादी झाली. निवडणुकीसाठी आग्रही असणाऱ्या सदस्यांनी सचिव अॅड. नितीन तेलगोटे यांना घेरून तत्काळ निवडणूक जाहीर करण्याची मागणी केली. अॅड. तेलगोटे यांनी निवडणूक का लांबली याचे स्पष्टीकरण देण्याचा बराच प्रयत्न केला, पण त्यांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत कुणीच नव्हते. शेवटी तेलगोटे यांनी येत्या आॅक्टोबरमध्ये निवडणूक घेण्याचे जाहीर केले. आमसभा शनिवारी दुपारी जिल्हा न्यायालयातील खोलीत पार पडली. विशेष म्हणजे, अध्यक्ष अॅड. प्रकाश जयस्वाल आमसभेत अनुपस्थित होते.
जिल्हा विधिज्ञ संघटनेला सन्मानजनक इतिहास आहे. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये अंतर्गत राजकारण व वैयक्तिक स्वार्थामुळे संघटनेच्या प्रतिष्ठेला सतत गालबोट लागत आहे. यापूर्वीच्या कार्यकारिणीने कार्यकाळ संपल्यानंतर तब्बल १८ महिने खुर्च्या सोडल्या नव्हत्या. त्या कार्यकारिणीत अॅड. सुदीप जयस्वाल अध्यक्ष तर, अॅड. मनोज साबळे सचिव होते. त्यावेळी संबंधित कार्यकारिणीवर बरीच टीका झाली होती. कोंडी असह्य झाल्यानंतर त्या कार्यकारिणीने निवडणूक जाहीर केली होती. कार्यक्रमानुसार, २३ जानेवारी २०१५ रोजी निवडणूक झाली. अध्यक्षपदी अॅड. प्रकाश जयस्वाल तर, सचिवपदी अॅड. नितीन तेलगोटे विजयी झाले. या कार्यकारिणीचा दोन वर्षांचा कार्यकाळ २२ जानेवारी-२०१७ मध्ये संपला. परंतु, त्यांनी आतापर्यंत निवडणूक जाहीर केली नव्हती. परिणामी, त्यांच्यावरही सदस्यांचा दबाव वाढत चालला होता. आमसभेत त्याचे पडसाद उमटले. माजी अध्यक्ष सुदीप जयस्वाल, माजी सचिव मनोज साबळे व इतरांनी विद्यमान कार्यकारिणीवर प्रचंड रोष व्यक्त केला. कार्यकाळ संपल्यानंतर पदावर राहण्याचा अधिकार संपतो. त्यामुळे ताबडतोब निवडणूक जाहीर करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर अॅड. तेलगोटे यांनी येत्या आॅक्टोबरमध्ये निवडणूक घेण्याचे जाहीर केले. लांबलेल्या निवडणुकीमुळे बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अॅन्ड गोवाने ‘डीबीए’ला कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
-----------------
कार्यक्रम आॅगस्टमध्ये
संघटनेची निवडणूक घेण्यासाठी निवडणूक समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या आॅगस्टमध्ये समितीची बैठक होईल. त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल. विविध विकासकामे, वकिलांच्या शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी इत्यादी बाबींमुळे संघटनेची निवडणूक लांबली. जाणीवपूर्वक काहीच करण्यात आले नाही. विद्यमान कार्यकारिणी सदस्यांच्या भावनांचा आदर करते.
----- अॅड. नितीन तेलगोटे, सचिव.