आरोपीला हॉटेलचे जेवण, ‘व्हीआयपी’ सेवा, पीएसआय निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 11:16 AM2023-09-09T11:16:22+5:302023-09-09T11:23:43+5:30
बेसातील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रकरण : पोलिस आयुक्तांची कारवाई
नागपूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला हुडकेश्वर पोलिस ठाण्यात बाहेरचे जेवण व बोलण्यासाठी मोबाइल अशी व्हीआयपी ट्रिटमेंट देणे हुडकेश्वर ठाण्यातील उपनिरीक्षक राठोड यांना चांगलेच महागात पडले आहे. पोलिस आयुक्तांनी या उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश काढले.
हुडकेश्वरमधील बेसा परिसरात राहणाऱ्या ताहा अरमान, त्याची पत्नी हिना आणि साळा अजहर यांनी घरकाम करण्यासाठी एका अल्पवयीन मुलीला नागपुरात आणले होते. या अल्पवयीन मुलीला ते सिगारेट, गरम चाकू आणि तव्याचे चटके देत होते. हिनाचा भाऊ अजहर या अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषणही करीत होता. ही बाब नागरिकांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी पीडित मुलीला बाहेर काढून याबाबत हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी ताहा अरमानसह हिना आणि तिचा भाऊ अजहर यांना अटक केली. मात्र, तीन दिवसांपूर्वी ठाण्यात पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात उपनिरीक्षक राठोड यांच्या टेबलजवळ बसून तहा अरमान मोबाइलवर बोलताना दिसत होता. तसेच आरोपीसाठी पोलिसांनी हॉटेलमधून जेवण, फिल्टरचे पाणी मागविल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे या गंभीर प्रकाराची पोलिस आयुक्तांनी दखल घेऊन आरोपीला व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात येत असल्याच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. चौकशीनंतर उपनिरीक्षक राठोड यांना निलंबित करण्यात आले आहे.