हॉटेल, रेस्टॉरंट, लॉंन, फार्म हाऊस,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:08 AM2021-06-09T04:08:30+5:302021-06-09T04:08:30+5:30
व्यापारी व उद्योजकांशी पालकमंत्र्यांनी साधला संवाद सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याच्या दिल्या सूचना लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हॉटेल, रेस्टॉरंट, ...
व्यापारी व उद्योजकांशी पालकमंत्र्यांनी साधला संवाद
सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याच्या दिल्या सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हॉटेल, रेस्टॉरंट, मंगल कार्यालये, लॉंन, फार्म हाऊस, रिसॉर्ट कोरोनावाढीचे हॉट स्पॉट ठरू नयेत. त्यामुळे या सर्व आस्थापनातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करूनच व्यवसायाला सुरुवात करा. या ठिकाणी कोरोना प्रोटोकॉलचे पालन झालेच पाहिजे, अशा पद्धतीचे सक्त वातावरण ठेवा, अशा सूचना ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत यांनी येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांसोबत सोमवारी हॉटेल, रेस्टॉरंट असोसिएशन, नागपूर व उद्योग, व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी या दोन्ही संघटनांनी विविध मागण्या पालकमंत्र्यांकडे मांडल्या. पालकमंत्र्यांनी सध्या अतिशय नाईलाजाने अनेक गोष्टींमध्ये सूट द्यावी लागत आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार नाही याची काळजी घ्या. शुक्रवारला या परिस्थितीचा पुन्हा आढावा घेऊन जनतेला काही सुविधा बहाल करण्यात येईल, असे स्पष्ट केले.
या बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी व अन्य अधिकारी उपस्थित होते. दुसऱ्या लाटेत आमच्या आजूबाजूच्या अनेक जणांच्या घरातील जीवलग गेले आहेत, हे आम्हाला विसरता कामा नये. कोरोनाला गृहित धरू नका. अत्यंत नाईलाजाने अनेक ठिकाणी शिथिलता आणावी लागत आहे. मात्र जनतेने सावध असावे, समाजातील सर्व घटकांनी या बाबीचा विचार करून ५ वाजेपर्यंतच्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन केले. काळजी न घेणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.