हॉटेल व्यावसायिकाने हडपले नऊ लाख !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:07 AM2021-05-01T04:07:03+5:302021-05-01T04:07:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हॉटेल व्यवसायात भागीदारी आणि बक्कळ नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने वाडीतील एका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हॉटेल व्यवसायात भागीदारी आणि बक्कळ नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका दाम्पत्याने वाडीतील एका महिलेचे नऊ लाख रुपये हडपले. मनोरमा निताई सातरा (वय २७) असे तक्रार करणाऱ्या महिलेचे नाव असून, त्या वाडीतील अशोक सम्राटनगरात राहतात.
त्यांच्या भावाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम वर्धा मार्गावरील युके सर्व्हिस अपार्टमेंट हॉटेल येथे ४ ऑक्टोबर २०१९ ला करण्यात आला. त्यानिमित्ताने मनोरमा यांची हॉटेलचा मालक पंकज पटियाल (वय ३८) आणि त्याची पत्नी सोनिया (वय ३०) या दोघांशी ओळख झाली. वाढदिवसाच्या कार्यक्रमातील झगमगाट पाहून आरोपी पंकज आणि त्याची पत्नी सोनिया या दोघांनी मनोरमा यांच्याशी संपर्क वाढवला. हॉटेलच्या व्यवसायात रक्कम गुंतवल्यास कमी कालावधीत भरपूर नफा मिळतो, अशी बतावणी करून पटियाल दाम्पत्याने मनोरमा यांना रक्कम गुंतविण्यास बाध्य केले. त्यामुळे ऑक्टोंबर २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत पटियाल दाम्पत्याला मनोरमा यांनी नऊ लाख रुपये दिले. दरम्यान, दीड वर्ष झाले तरी आरोपींनी मनोरमा यांना एकही रुपया नफा दिला नाही. पैशांची मागणी केली असता प्रत्येक वेळेस ते वेगवेगळे कारण सांगायचे. त्यांची टाळाटाळ लक्षात आल्यामुळे मनोरमा यांनी त्यांच्याकडे आपली मुद्दल रक्कम परत मागितली. मात्र आरोपींनी मनोरमा यांना एकही रुपया परत केला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे मनोरमा यांनी सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्याची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात पटियाल दाम्पत्याविरुद्ध गुरुवारी (दि. २९) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
--
अनेकांची फसवणूक
आरोपी दाम्पत्य मूळचे उत्तराखंडचे रहिवासी आहे. त्यांनी अशा प्रकारे आणखी अनेक लोकांना चुना लावला असावा, अशी शंका असून, पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहेत.
---