हॉटेल व्यावसायिक म्हणतात, त्यापेक्षा बंद ठेवणे बरे..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 09:43 PM2021-03-20T21:43:28+5:302021-03-20T21:43:50+5:30
Nagpur news राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने नागपुरात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यात नागपुरातील रेस्टॉरंट व्यवसाय सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयाला नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशन (एनआरएचए)ने विरोध दर्शविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने नागपुरात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यात नागपुरातील रेस्टॉरंट व्यवसाय सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. लग्नकार्य आणि सांस्कृतिक समारंभानाही परवानगी नाकारली आहे. या निर्णयाला नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशन (एनआरएचए)ने विरोध दर्शविला आहे. एनआरएचएचे अध्यक्ष तेजिंदर सिंग रेणू व सचिव दीपक खुराणा यांनी यासंदर्भात एक संयुक्त पत्रक प्रकाशित करून प्रशासनाच्या निर्णयाचा विरोध व्यक्त केला आहे. हा व्यवसाय रात्रीच सुरू असतो, हे प्रशासनाला माहीत असतानाही सायंकाळी ७ वाजेपर्यंतच परवानगी देणे आश्चर्यकारक आहे. हॉटेल्स व्यावसायिकांवर हा अन्याय आहे. यापेक्षा रेस्टॉरंट बंद ठेवले तर वीज, कर्मचाऱ्यांचे पगार, मेंटेनन्सचा खर्च तरी वाचेल. पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, मराठवाडा आदी ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर असतानाही असा निर्णय तिथे नाही. विदर्भासोबतच ही सावत्रपणाची वागणूक का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
ऑनलाईन सेवेसाठी प्रशासनाने रेस्टाॅरंटचे किचन रात्री ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली असताना, दुसरीकडे असा निर्णय सुसंगत नाही. संपूर्ण लॉकडाऊन काळात याच व्यवसायातील अनेक रेस्टॉरंट्सने अन्न शिजवून गरजूंची सेवा केली होती. त्याचे हे प्रतिफळ म्हणावे काय? सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा.
- तेजिंदर सिंग रेणू, अध्यक्ष, एनआरएचए
...