नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स, धाबे सज्ज, होणार कोट्यवधींची उलाढाल; पोलिसांची ‘थर्टी फर्स्ट’ सेलिब्रेशनवर नजर

By मोरेश्वर मानापुरे | Published: December 30, 2023 08:36 PM2023-12-30T20:36:34+5:302023-12-30T20:36:42+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथके व चेकपोस्ट

Hotels, dhabas are ready to welcome the new year, there will be a turnover of crores; | नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स, धाबे सज्ज, होणार कोट्यवधींची उलाढाल; पोलिसांची ‘थर्टी फर्स्ट’ सेलिब्रेशनवर नजर

नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स, धाबे सज्ज, होणार कोट्यवधींची उलाढाल; पोलिसांची ‘थर्टी फर्स्ट’ सेलिब्रेशनवर नजर

नागपूर : नववर्षाच्या स्वागतासाठी नागपुरातील लहानमोठे हॉटेल्स व धाबे सज्ज झाले आहेत. यंदा शहरात सिनेकलाकार येणार नाहीत, पण मोठ्या हॉटेल्सने नृत्य, संगीत, मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले असून त्यांचा पॅकेजवर तसेच कार्यक्रम कौटुंबीक आणि मैत्रीपूर्ण असावा, यावर जास्त भर आहे. थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करताना छेडछाडीचे प्रसंग, तसेच बेधुंत नशेत बेदारकरपणे गाड्या चालविण्याचे प्रकार रोखण्यासाठी पोलिस यंत्रणा तर परमीटविना मद्य विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी जिल्हा उत्पादन शुल्क विभाग सज्ज झाला आहे. नववर्षाच्या कार्यक्रमातून जिल्ह्यात कोट्यवधींची उलाढाल होणार आहे.

नववर्ष स्वागतासाठी ३१ डिसेंबरला हॉटेल, रेस्टारंट पहाटे ५ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार रात्रभर पोलिस गस्त घालणार आहेत. हायवेवरील हॉटेल, धाब्यांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. याशिवाय नागपूर जिल्हा उत्पादन शुल्क विभागाने दोन भरारी पथके आणि चार तात्पुरत्या चेकपोस्ट उभारल्या आहेत. परमीटविना मद्यविक्री करणाऱ्यांवर लक्ष ठेवणार आहे. डीजे वाजविण्याची वेळ रात्री १२ पर्यंत ठेवण्यात आली असून, सार्वजनिक ठिकाणी मैदानावर पार्ट्या आयोजित केल्यास कारवाई केली जाणार आहे.

हॉटेल्स, धाब्यावर तयारी, विद्युत रोषणाई

नागपूर जिल्ह्यातील अनेक हॉटेल्स, धाबे पार्ट्यांसाठी सज्ज झाले आहेत. अनेकांनी विद्युत रोषणाई केली आहे. काही ठिकाणी संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ठराविक बिलावर सूट देण्याचे आमिषही ग्राहकांना दाखविण्यात आले आहे. दररोजपेक्षा अतिरिक्त अर्थात जादा टेबलाचे नियोजनही हॉटेल्स व धाब्यांवर करण्यात आले आहे. सार्वजनिक इमारती, व्यापारी प्रतिष्ठाने आणि काही धार्मिक ठिकाणांवर नववर्षानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून त्यामुळे परिसर उजळून निघाला आहे.

सामाजिक उपक्रम

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी काही संस्था आणि संघटनांनी १ जानेवारीला आरोग्य शिबिरासह सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. काहींनी ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता केक कापून नववर्ष साजरे करण्याचा संकल्प केला आहे. शहरातील टेकडी गणपती, साई मंदिरासह अन्य मंदिरे भक्तांच्या दर्शनासाठी खुली राहणार आहे.

पोलीस सतर्क, दारूड्यांवर होणार कारवाई

नववर्षाच्या स्वागतसाठी मद्य पिऊन धिंगाणा घालणे, भरधाव वाहने चालविणे मोठ्याने हॉर्न वाजता ध्वनीप्रदूषण, शिवाय गंभीर अपघातही होतात. यासाठी जिल्हा पोलीस दल आणि शहर वाहतूक शाखेतर्फे पहाटेपर्यंत विशेष नाकाबंद मोहीम राबविण्यात येणार आहे. प्रमुख चौकात वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी मद्याचे सेवन करून वाहन चालवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

परवानाविना मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई

परवाना न घेता हॉटेलमध्ये मद्यविक्री केल्यास कारवाई केली जाणार आहे. नियंत्रणासाठी दोन भरारी पथकांसह चार तात्पुरत्या चेकपोस्ट उभारण्यात आल्या आहेत. परवानाविना मद्यविक्री करू नका, असे निर्देश हॉटेल्सला देण्यात आले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत नागपूर जिल्ह्यात एक दिवसाचे ५२ परमीट जारी करण्यात आले आहेत.
सुरेंद्र मनपिया, जिल्हा अधीक्षक, नागपूर उत्पादन शुल्क विभाग.

कौटुंबीक व मैत्रीपूर्ण कार्यक्रमांवर भर

यंदा कौटुंबीक आणि मैत्रीपूर्ण कार्यक्रमांसह नृत्य, संगीत आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांच्या आयोजनावर हॉटेल्सचा भर आहे. ग्राहकांसाठी नि:शुल्क खोल्यासह विशेष पॅकेज तयार केले आहे. जास्तीत जास्त १०० ते १५० लोकांचे आयोजन करण्यात येणार आहे. लहानांसाठी विशेष व्यवस्था आहे. भाग्यशाली सोडतीतून पुरस्कार देण्यात येणार आहे.
प्रांतीक रे, महाव्यवस्थापक, हॉटेल प्राईड.

सदस्यांना कायद्याचे पालन करण्याचा सूचना

नववर्ष स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करताना सरकारने जारी केलेले नियम आणि कायद्यांचे पालन करण्याच्या सूचना असोसिएशनच्या सदस्यांना केल्या आहेत. नववर्षाच्या स्वागताची सर्वांची तयारी जोरात आहे. आयोजनाचा आनंद घेण्यास प्रत्येकजण उत्सुक आहे. यंदा नवर्षाचे स्वागत कुटुंबीयांसह करण्याची सर्वांची तयारी आहे.
तेजिंदरसिंग रेणू, अध्यक्ष, नागपूर रेसिडेन्सियल हॉटेल्स असोसिएशन.

Web Title: Hotels, dhabas are ready to welcome the new year, there will be a turnover of crores;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.