हॉटेल्स पाळत नाहीत ‘बेस्ट बिफोर’चा नियम
By मोरेश्वर मानापुरे | Published: September 7, 2023 07:21 PM2023-09-07T19:21:32+5:302023-09-07T19:22:00+5:30
सणासुदीत ग्राहकांना खरेदी करावी लागते शिळी मिठाई
नागपूर : सणांच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये उत्साह दिसून येत आहे. या काळात बाजारपेठेत विविध प्रकारचे पेढे, मिठाई, खवा, नमकीन आदी पदार्थांमध्ये भेसळ आढळू शकते किंवा हे पदार्थ वापरण्याची तारीख उलटून गेलेली असू शकते. बहुतांश हॉटेल्स अन्न व औषध प्रशासन विभागाचे ‘बेस्ट बिफोर’चा नियम पाळत नसल्याचे दिसून येते. याकडे विभागाचे दुर्लक्ष असून शिळी मिठाई खाल्ल्याने आरोग्याला धोका निर्माण होण्याची जास्त शक्यता आहे.
खाद्यतेल, तूप, दूध, दही इत्यादी पदार्थांमध्येही भेसळ असू शकते. त्यामुळे ग्राहकांनी दुकानात खरेदी करताना ते ताजे पदार्थ आहेत का नाही, हे तपासून घेण्याची जबाबदारी विभागाची कमी तर ग्राहकांची जास्त झाली आहे. सणांच्या काळात ग्राहकांना शुद्ध पदार्थ मिळावे म्हणून अधिकाºयांनी दुकानांच्या तपासण्या आणि अन्न पदार्थांचे नमूने तपासणीची विशेष मोहीम हाती घेण्याची मागणी ग्राहक संघटनांकडून होऊ लागली आहे.
‘बेस्ट बिफोर’चा बोर्ड पाहिला का?
हॉटेल्समध्ये ग्राहकांच्या माहितीसाठी मिठाईवर ‘बेस्ट बिफोर’चा बोर्ड लावणे बंधनकारक आहे. अर्थात मिठाईची उत्पादन आणि वापरण्यायोग्य तारीख लिहिणे आवश्यक आहे. पण रक्षाबंधन सणात बहुतांश हॉटेल्समध्ये मिठाईच्या ट्रेवर हा बोर्ड दिसला नाही. याचा अर्थ अनेक हॉटेल्समध्ये तारीख उलटून गेलेल्या मिठाईची विक्री झाली असावी, अशी शक्यता आहे. या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई शून्य आहे.
दुधाची मिठाई २४ तास, तर मोतीचूर लाडू ४८ तास
हॉटेल्समधील वेगवेगळ्या मिठाईच्या ट्रेवर वेगवेगळ्या तारखेचे टॅग लावणे बंधनकारक आहे. नियमानुसार हॉटेल मालकाला दुधाची मिठाई २४ तास आणि मोतीचूरचे लाडू ४८ तासांच्या आत विकणे बंधनकारक आहे. खव्यापासून तयार केलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो २४ तासांच्या आतच करावे. तसेच ते साठवणूक करण्यायोग्य तापमानात ठेवावे. मिठाईची चवीत फरक जाणवल्यास ती नष्ट करावी.
शिळ्या मिठाईमुळे विषबाधेची शक्यता
अनेक हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये शिळ्या मिठाईची विक्री केल्याची अनेक उदाहरणे आहे. अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे प्रत्येक हॉटेल्सची तपासणी करण्यात येत नसल्यामुळे हॉटेल्सचे फावते. पण दुधाचे पदार्थ २४ तासाच्या आत विकावे लागतात. पण अनेक हॉटेल्समध्ये शिळ्या मिठाईची विक्री करण्यात येत असल्यामुळे विषबाधेची शक्यता जास्त असते.
चार महिन्यांत १२ दुकानांवर कारवाया
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणातर्फे मिठाई विक्रेत्यांना प्रत्येक मिठाईच्या ट्रेवर दर्शनी भागात मिठाई तयार केल्याचा दिनांक आणि ती वापरण्यायोग्य कालावधी यांचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे. ते नसल्यास विभाग कारवाई करते. यावर्षी सणांच्या काळात १२ दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे.
मिठाई विक्रेत्यांना प्रत्येक मिठाईच्या ट्रेवर दर्शनी भागात मिठाई तयार केल्याचा दिनांक आणि ती वापरण्यायोग्य कालावधी अर्थात ‘बेस्ट बिफोर’ यांचा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे. या संदर्भात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सणांच्या दिवसात ही मोहीम कठोरपणे राबवू.
अभय देशपांडे, उपायुक्त (प्रभारी, अन्न), अन्न व औषध प्रशासन विभाग.