Video : संघ दरबारातून मुख्यमंत्री रवाना, सरसंघचालकांशी दीड तास 'सत्ता पे चर्चा'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 11:45 PM2019-11-05T23:45:42+5:302019-11-05T23:48:29+5:30
निवडणुकात भाजपाला अपेक्षित जागा मिळवता आल्या नाही. त्यानंतर शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाबाबत ताठर भूमिका घेतली.
नागपूर : शिवसेनेने मुख्यमंत्रिपदासंदर्भात कठोर भूमिका घेतली असल्यामुळे महाराष्ट्रातील सत्तास्थापन करण्यासंदर्भात कोंडी निर्माण झाली आहे. राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली व सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. शिवसेनेची भूमिका, सत्तास्थापनेतील अडथळे, भविष्यातील अडथळे यावर प्रामुख्याने या बैठकीत चर्चा झाली. यासोबतच अयोध्या येथील राममंदिर प्रकरणाचा निकाल पुढील आठवड्यात येण्याची शक्यता आहे, त्या पार्श्वभूमीवर राज्यात शांतता प्रस्थापित ठेवण्यासंदर्भातदेखील चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भेटीनंतर सत्तास्थापनेतील अडथळे दूर होतील असे कयास लावण्यात येत आहेत.
निवडणुकात भाजपाला अपेक्षित जागा मिळवता आल्या नाही. त्यानंतर शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाबाबत ताठर भूमिका घेतली. शिवसेनेकडून दररोज भाजपवर दबाव आणण्यात येत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसकडूनदेखील विविध वक्तव्ये समोर आली. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आले आहे. भाजपच्या गोटातही राजकीय हालचालींना सोमवारपासून वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानीदेखील चर्चा झाली. मंगळवारी भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचाच मुख्यमंत्री असावा असाच निर्णय झाला.
सत्तास्थापनेबाबत तळ्यातमळ्यात सुरू असताना मुख्यमंत्री रात्री ९ नंतर नागपुरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर त्यांनी थेट संघ मुख्यालयच गाठले. रात्री ९.३० नंतर त्यांनी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली व त्यांना सद्यस्थितीतील राजकीय घडामोडींबाबत सखोल माहिती दिली. कोंडी फोडण्यासाठी इतर पर्याय कसे वापरले जाऊ शकतात यावरदेखील सुमारे दीड तास चाललेल्या या बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. रात्री अकराच्या सुमारास मुख्यमंत्री संघ मुख्यालयातून बाहेर पडले. त्यांनी या बैठकीसंदर्भात कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.