तासाभरात लागला एलएलबीचा निकाल
By admin | Published: July 26, 2014 02:54 AM2014-07-26T02:54:28+5:302014-07-26T02:54:28+5:30
महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम ७२ अनुसार ४५ दिवसांत
हायकोर्टात विद्यापीठाची ग्वाही : विद्यार्थ्यांना दिलासा
नागपूर : महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याच्या कलम ७२ अनुसार ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे आवश्यक असताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एलएलबी अभ्यासक्रमाच्या सहाव्या सेमिस्टरचा निकाल ८२ दिवस लोटूनही लावला नव्हता. विद्यार्थ्यांनी हायकोर्टात धाव घेतल्यामुळे विद्यापीठाने शुक्रवारी निकाल जाहीर करण्याची ग्वाही दिली. यानंतर तासाभरात निकालही जाहीर करण्यात आला. तासाभरात निकाल जाहीर करणे शक्य असताना विद्यार्थ्यांना वारंवार वेठीस का धरल्या जाते असा प्रश्न याप्रकरणामुळे उपस्थित झाला आहे.
तीन वर्षीय एलएलबी अभ्यासक्रमाच्या सहाव्या सेमिस्टरची परीक्षा गेल्या ३ मे रोजी संपली. यानंतर नियमानुसार १७ जूनपर्यंत निकाल घोषित होणे अपेक्षित होते. परंतु, विद्यापीठाची आज सायंकाळपर्यंत निकाल घोषित करण्याची काहीच तयारी नव्हती. संबंधित याचिका सुनावणीसाठी आल्यानंतर विद्यापीठाने आज, सायंकाळी ५ वाजेपर्यंत निकाल जाहीर करण्याचे वक्तव्य केले. त्यानुसार निकालही जाहीर करण्यात आला. नॅशनल लॉ स्कूलतर्फे एलएलएम अभ्यासक्रमाकरिता राष्ट्रीयस्तरावर प्रवेश परीक्षा घेण्यात येते. याशिवाय बार कौन्सिल आॅफ इंडियाने वकिली व्यवसाय सुरू करण्यापूर्वी एआयबीई (आॅल इंडिया बार एक्झॅम) पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य केले आहे. ही परीक्षा ९ सप्टेंबर रोजी होणार असून प्रवेश नोंदणीची अखेरची तारीख २७ जुलै होती. विद्यापीठाने पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या दहाव्या सेमिस्टरचा निकाल जाहीर केला, पण तीन वर्षीय अभ्यासक्रमाच्या सहाव्या सेमिस्टरचा निकाल रखडला होता. परिणामी विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षांना बसण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. यामुळे विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून सहाव्या सेमिस्टरचा निकाल लवकर जाहीर करण्याची व एआयबीई पात्रता परीक्षा प्रवेश नोंदणीची अखरेची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती.
न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांच्यासमक्ष याचिका सुनावणीसाठी आल्यानंतर सायंकाळी ५ वाजतापर्यंत निकाल जाहीर करण्याचे वक्तव्य विद्यापीठातर्फे करण्यात आले. तसेच, बार कौन्सिलतर्फे अॅड. कैलाश नरवाडे यांनी एआयबीई पात्रता परीक्षेच्या प्रवेश नोंदणीची अखेरची तारीख १३ आॅगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली. दोन्ही विनंत्या पूर्ण झाल्यामुळे न्यायालयाने याचिका निकाली काढली.