मॉडेल होण्यासाठी सोडले घर : नागपूर लोहमार्ग पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:31 AM2019-06-21T00:31:09+5:302019-06-21T00:32:45+5:30
टीव्ही आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे तो मॉडेलिंगच्या क्षेत्राकडे आकर्षित झाला. मॉडेल बनण्याचे स्वप्न त्याने बघितले अन् त्यासाठी घरून निघाला. मात्र, नागपुरात येताच लोहमार्ग पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : टीव्ही आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे तो मॉडेलिंगच्या क्षेत्राकडे आकर्षित झाला. मॉडेल बनण्याचे स्वप्न त्याने बघितले अन् त्यासाठी घरून निघाला. मात्र, नागपुरात येताच लोहमार्ग पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्याची घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर घडली.
ओडिशा येथील विशाल (बदललेले नाव) हा १५ वर्षाचा बालक ९ व्या वर्गात शिकतो. सतत सोशल मीडिया टीव्हीच्या संपर्कात आल्याने त्याने मॉडेलिंगच्या क्षेत्रात करिअर करण्याचे ठरविले. १४ जून रोजी तो घरी कुणालाही न सांगता निघाला. कुठलीच माहिती नसल्यामुळे काही दिवस त्याने प्रवासात घालविले. तिकडे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरु केला. प्रवास करत तो गुरुवारी सायंकाळी नागपूर रेल्वेस्थानकावर आला. प्री-पेड ऑटो बुथजवळ तो उभा होता. अल्पवयीन मुलगा असल्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक मुबारक शेख, उपनिरीक्षक रोशन खांडेकर, उपनिरीक्षक रवी वाघ, हेड कॉन्स्टेबल प्रमोद घ्यारे, प्रल्हाद पत्रे, रोशन मोगरे यांनी त्याची विचारपूस केली. त्यावर मॉडेल होण्यासाठी घरून निघून आल्याचे त्याने सांगितले. त्याला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्याच्याकडून नातेवाईकांचा मोबाईल क्रमांक घेऊन त्यावर संपर्क साधण्यात आला. त्याची मावशी नागपुरातच राहते. मुबारक शेख यांनी त्याच्या मावशीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्याचे नातेवाईक लोहमार्ग पोलीस ठाण्यात पोहोचले. खात्री पटल्यानंतर विशालला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. मुलगा सुखरुप भेटल्यामुळे नातेवाईकांनी लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले.