नितीन गडकरींना वाढदिवसाच्या ‘हाऊसफुल्ल’ शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 10:14 PM2022-05-27T22:14:58+5:302022-05-27T22:19:38+5:30

Nagpur News केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या ६५व्या वाढदिवशी हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. वर्धा मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी सकाळपासून भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची रीघ लागली होती.

Housefull wishes to Nitin Gadkari on birthday | नितीन गडकरींना वाढदिवसाच्या ‘हाऊसफुल्ल’ शुभेच्छा

नितीन गडकरींना वाढदिवसाच्या ‘हाऊसफुल्ल’ शुभेच्छा

googlenewsNext
ठळक मुद्देनेते, कार्यकर्त्यांची निवासस्थानी रीघ सोशल मीडियावरदेखील शुभेच्छांचा वर्षाव

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या ६५व्या वाढदिवशी हजारो कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. वर्धा मार्गावरील त्यांच्या निवासस्थानी सकाळपासून भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची रीघ लागली होती. दुपारी उशीरापर्यंत ‘हाऊसफुल्ल’ गर्दी दिसून आली. अनेक आमदारांनी गडकरी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे काम करण्याची आणखी स्फूर्ती मिळते, अशा भावना गडकरी यांनी यावेळी व्यक्त केल्या. 

सकाळपासूनच गडकरींचे अभीष्टचिंतन करण्यासाठी कार्यकर्ते निवासस्थानाजवळ जमले होते. काहींनी चक्के भजनाच्या गजरात गडकरी यांना शुभेच्छा दिल्या. गडकरी यांच्या निवासस्थानाचे दरवाजे सामान्य नागरिक, कार्यकर्त्यांसाठीदेखील खुले होते. अगदी झोपडपट्टीत राहणाऱ्यांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वच स्तरांतील नागरिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच लहान मुलांचादेखील समावेश होता. गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांचे औक्षण केले.

यानंतर गडकरी यांनी घरी येणाºया प्रत्येक नेता व कार्यकर्त्यांकडून शुभेच्छांचा स्वीकार केला. सोबतच देशभरातील ‘व्हीव्हीआयपी’ मान्यवरांनी दूरध्वनीवरून गडकरी यांचे अभीष्टचिंतन केले.

पंतप्रधानांकडून ‘ऑनलाइन’ शुभेच्छा

प्रोटोकॉलप्रमाणे देशातील बहुतांश मुख्यमंत्री व केंद्रीयमंत्र्यांनी गडकरी यांना दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या. गडकरी हे देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासात मौलिक भूमिका पार पाडत असून, देश त्यामुळे आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे, अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

‘सोशल मीडिया’वर शुभेच्छांचा पाऊस

दरम्यान, अनेक व्हीव्हीआयपी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ‘सोशल मीडिया’वर गडकरींना शुभेच्छा दिल्या. अनेकांनी ट्विटर, फेसबुकवर शुभेच्छा दिल्या, तर बऱ्याच जणांनी व्हॉट्सॲपवर गडकरींना शुभेच्छा देणारे स्टेट्सच ठेवले होते.

Web Title: Housefull wishes to Nitin Gadkari on birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.