गृहिणींचे किचन बजेट बिघडले, मसाला पदार्थात भरपूर वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:11 AM2021-08-22T04:11:29+5:302021-08-22T04:11:29+5:30
रामटेक : लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले.यातच अनेकांचा रोजगारही गेला; मात्र इंधन दरवाढीचा परिणाम आता किराणा मालावरही होऊ ...
रामटेक : लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले.यातच अनेकांचा रोजगारही गेला; मात्र इंधन दरवाढीचा परिणाम आता किराणा मालावरही होऊ लागला आहे. मसाला पदार्थात झालेल्या वाढीमुळे गृहिणींचे किचन बजेट बिघडले आहे. यासोबतच चांगले जेवण करण्यासाठी आता जादा पैसे मोजावे लागत आहेत. याबाबत रामटेक तालुक्यातील बाजाराचा आढावा घेतला असता बदाम फुलाचा जुना दर प्रतिकिलाे ६०० रुपये हाेता. तो आता ८०० रुपयांवर गेला आहे. विलायचीचा जुना दर ७२० होता. तो आता ८०० रुपयांवर पोहोचला आहे. किलोला ४८० रुपये मिळणारी काळी मिरी आता ५४० वर गेली आहे. जिरे-१९०, लवंग- ७८०, जायपत्रीचा दर २,१२० रुपये किलो असा झाला आहे. दालचिनीचा जुना दर २८० रुपये इतका होता. तो आता ३२० वर गेला आहे. खसखसचा जुना दर १६०० रुपये होता. तो १८०० रुपये प्रतिकिलो झाला आहे.
मसाला पदार्थाचे दक्षिण भारत व काेकणात माेठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने पिकावर विपरित परिणाम झाला आहे.
---
मसाल्याचे दर वाढलेले आहेत. पण भाजीमध्ये मसाल्याचा समावेश करावा लागताे. किराणा मालाचे सर्वच दर वाढले आहेत. त्यामुळे घर चालविणे कठीण झाले आहे.
- संध्या महाजन, गृहिणी, रामटेक
---
मसाल्याच्या पदार्थाचे अधिक सेवन केले तर आम्लपित्ताचा त्रास हाेताे. त्यामुळे भाज्यामध्ये मसाला कमी वापरायला हवा. तरी काही पदार्थांसाठी मसाला वापरावा लागताे. पण सध्या हे पदार्थ महागही झाले आहेत. त्यामुळे यांच्या वापरावर मर्यादा आल्या आहेत.
- सारिका सालाेडकर, गृहिणी, गुरुकुल नगर.
---
मसाल्याच्या पदार्थाची टंचाई झाली की दर वाढतात. काही पदार्थ आयात हाेत असतात. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा परिणाम यावर हाेत असताे. सध्या किराणा साहित्याचे दर वाढलेले आहेत. यामध्ये वाहतुकीचा वाढलेला खर्च प्रमुख कारण आहे.
- शंकर जीवतोडे, किराणा व्यावसायिक
---
वादळ, पाऊस आल्याने पिकाचे नुकसान हाेते. त्यामुळे मालाची टंचाई हाेते. हाॅटेल व्यावसायिक माेठ्या प्रमाणात मसाले खरेदी करतात. पण दर वाढल्याने त्यांनीही हात आखडता घेतला आहे. सध्या मसाल्याच्या पदार्थाची आवक कमी झाली आहे.
- राेहित लेंढें, किराणा व्यावसायिक, रामटेक