डझनभर राष्ट्रीयीकृत बँकांना सोडून खासगी कंपनीत गुंतवणूक कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:12 AM2021-08-15T04:12:10+5:302021-08-15T04:12:10+5:30

नोंद केली ५० लाखांची अन् गुंतवणूक कोटींची अभय लांजेवार उमरेड : सर्वप्रथम सोसायटीच्या तत्कालीन संचालकांनी तब्बल १ कोटी रुपयांची ...

How about investing in a private company apart from dozens of nationalized banks? | डझनभर राष्ट्रीयीकृत बँकांना सोडून खासगी कंपनीत गुंतवणूक कशी?

डझनभर राष्ट्रीयीकृत बँकांना सोडून खासगी कंपनीत गुंतवणूक कशी?

Next

नोंद केली ५० लाखांची अन् गुंतवणूक कोटींची

अभय लांजेवार

उमरेड : सर्वप्रथम सोसायटीच्या तत्कालीन संचालकांनी तब्बल १ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा ठराव पारित केला. नंतर सहायक निबंधक कार्यालयाने काही अटींवर मंजुरी दिली. त्यानंतर डब्ल्यू. सी. एल. एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. उमरेड प्रोजेक्ट या सोसायटीने तब्बल १ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. परिसरात डझनभर राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा असताना या बँकांना सोडून कोलकत्ता येथील व्हेटेल एव्हरेस्ट कॅप सोल्यूशन्स लिमिटेड या खासगी कंपनीसोबत सूत जुळलेच कसे आणि एवढी मोठी गुंतवणूक केलीच कशी? असा सवाल कामगार वर्गात आता विचारला जात आहे.

वर्ष-दोन वर्षांत दामदुप्पट करणाऱ्या ऑफरला नागरिक बळी पडतात, असे आतापर्यंत उजेडात आले आहे. एकीकडे सहकार क्षेत्राच्या नियमावली कडक आहेत. यामुळे एखादी सहकारी पतसंस्था अशा प्रकारच्या प्रलोभनाच्या भानगडीत पडत नाही. असे असतानाही डब्ल्यू. सी. एल. सोसायटी लोभात अडकली कशी आणि यामागे कोण? असा सवाल कामगार करीत आहेत. शक्कल कुणाची आणि यामध्ये सोयायटीला किती नफा-तोटा झाला या संपूर्ण बाबींची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी जोर धरत आहे.

लोकमतने शनिवारच्या अंकात ‘डब्ल्यू. सी. एल. सोसायटी सीबीआयच्या फेऱ्यात’ या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले. यामुळे सदर सोसायटीबाबतच्या बऱ्याच कारनाम्यांचीही चर्चा रंगू लागली आहे. सोसायटीच्या संचालकपदी बसण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो आणि गुलालही उधळला जातो. यामुळे अंदाजे ३० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या सोसायटीचे ऑडिट होणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

२२ मे २०१५ ला सदर सोसायटीच्या नवीन कार्यकारिणीने कार्यभार स्वीकारला. यापूर्वीचाच तब्बल एक कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा हा प्रकार तत्कालीन संचालक मंडळाच्या संमतीने घडलेला आहे. सहायक निबंधक कार्यालयाने सुद्धा केवळ काही अटींवर या सोसायटीला संमती प्रदान केली होती. त्यानंतर खासगी कंपनीत गुंतवणूक का केली, अशी साधी विचारणा सुद्धा निबंधक कार्यालयाकडून झाली नाही. यामुळे सदर कार्यालय सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

--

लोभात अडकली सोसायटी

२००९ ला कोलकाता येथील व्हेटेल एव्हरेस्ट कॅप सोल्युशन्स लिमिटेड कंपनीत एक कोटी रुपयांची गुंतवणूक डब्ल्यू. सी. एल. सोसायटीने केली. त्यानंतर व्हेटेल कंपनीने १ फेब्रुवारी २०१० पासून टप्याटप्याने एकूण ३८ लाख रुपये सोसायटीच्या खात्यात वळती केल्याच्या नोंदी आहेत. सोबतच ६ सप्टेंबर २०१०ला ५० लाख रुपयांची रक्कम विड्रॉल आणि एनईएफटी केल्या गेली. सोसायटीचा लेखाजोखा समतोल राखण्यासाठी ही शक्कल लढविण्यात आली. याबाबतचीही सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.

---

कामकाजाची लेखी नोंद

या गुंतवणूक प्रकरणात २९ ऑक्टोबर २००९ला प्रोसिडिंग (कामकाजाची लेखी नोंद) लिहिल्या गेले. यामध्ये ५० लाख रुपये गुंतवणुकीचा ठराव संचालक मंडळाने घेतला होता, असे असले तरी व्हेटेल कंपनीत एक कोटी रुपयांची गुंतवणूक केल्या गेली. हा संपूर्ण गुंतवणुकीचा प्रकार सोसायटीचे अध्यक्ष सी. एस. पिल्ले, उपाध्यक्ष अजय मोहोड, सचिव बबन पोटे, कोषाध्यक्ष प्रकाश नागभीडकर यांच्या कार्यकाळातील असून, सरव्यवस्थापक म्हणून कल्याण हलदर कार्यरत होते.

Web Title: How about investing in a private company apart from dozens of nationalized banks?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.