गळफासाच्या चित्ररथाला परवानगी दिलीच कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:40 AM2017-11-05T00:40:20+5:302017-11-05T00:40:39+5:30

‘शेतकरी आत्महत्या’चे प्रातिनिधिक रूप दर्शविण्यासाठी अभिनयाद्वारे जीव ओतला. मात्र हाच अभिनय एका कलावंताच्या जीवावर बेतला.

 How to allow the painting painting? | गळफासाच्या चित्ररथाला परवानगी दिलीच कशी?

गळफासाच्या चित्ररथाला परवानगी दिलीच कशी?

Next
ठळक मुद्देबाजू सावरण्यासाठी चिखलफेक : रामटेकची ‘शोभा’यात्रा कलंकित, ‘लाईव्ह डेमो’चे अनेकजण साक्षीदार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘शेतकरी आत्महत्या’चे प्रातिनिधिक रूप दर्शविण्यासाठी अभिनयाद्वारे जीव ओतला. मात्र हाच अभिनय एका कलावंताच्या जीवावर बेतला. त्यामुळे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसू लागताच आता बाजू सावरण्याच्या प्रयत्नात आहे. फासाचा जिवंत अभिनय करण्याची परवानगी आयोजकांनी दिलीच कशी, पोलीस विभागही अशा चित्ररथासाठी दोषी नाही काय, असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. घटना घडताच त्या तरुणाचाच दोष दाखविण्यासाठी पुढाकार घेण्यात आला, हे विशेष!
रामटेकच्या शोभायात्रेत मनोज अरुण धुर्वे (२८, रा. नवरगाव, ता. रामटेक) या तरुण कलावंताचा बळी गेला. रामटेक येथील ही शोभायात्रा दूरवर प्रसिद्ध असून ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळते. विशेष म्हणजे, शोभायात्रेत सहभागी आकर्षक चित्ररथासाठी प्रसिद्ध सिनेअभिनेता, अभिनेत्रीच्या हस्ते पुरस्कार देण्याची परंपरा लाभली आहे. वैकुंठ चतुर्दशनिमित्त ही शोभायात्रा निघत असून परंपरेनुसार गुरुवारी (दि. २) शोभायात्रा निघाली. त्यात विविध विषयांवरील देखावे असणारे चित्ररथ सहभागी झाले होते. काहींनी जिवंत देखावे साकारत रामटेकवासीयांचे लक्ष वेधले. ट्रक, ट्रॅक्टरवरील चित्ररथ आणि पायदळ अशी चित्ररथाची दोन गटात विभागणी करण्यात आली होती.
मनोज असलेला चित्ररथ हा एमएच-४०/एएम-२१६३ क्रमांकाच्या ट्रॅक्टरवर होता. सदर ट्रॅक्टर हा चित्ररथाचे संयोजक राजेश जरवरकर (४५, रा. नवरगाव) यांच्या मालकीचा व शोभायात्रेतील चित्ररथ क्रमांक ३ होता. त्यावर महेश जुगनाके (३०, रा. नवरगाव) हा चालक होता. या ट्रॅक्टवर मागे बसून विलास जुगनाके हा वायरची कुणी ओढताण करू नये म्हणून देखरेख ठेवून होता. गजानन दोडके (२५) आणि युवराज दोडके (३५) हे शेतातील धानाच्या पेंड्या विळ्याने कापण्याचा अभिनय करीत होते.
कचरु (५०, रा.बोरी) आणि मनोज धुर्वे (२८, रा. नवरगाव) हे फासावर लटकणाºया शेतकºयाचा तर सेवकराम भोयर (५५, रा. नवरगाव टोली) हे आत्महत्या करु पाहणाºया शेतकºयाच्या पत्नीचा अभिनय करीत होते. सदर चित्ररथाचे संयोजक राजेश जरवरकर हे चित्ररथाच्या बाजूने पायी चालत व्यवस्था सांभाळून होते. अठराभुजा गणेश मंदिरात श्रीगणेशाची पाद्यपूजा केल्यानंतर रामटेकच्या शोभायात्रेला सुरुवात झाली. बसस्थानकमार्गे शोभायात्रा आंबेडकर चौकात पोहोचली. तिथे सर्व चित्ररथांचे परीक्षण करण्यात आले. तेथून पुढे जाऊन गांधी चौकात रात्री ११.३० वाजताच्या सुमारास चित्ररथाचे परीक्षण करीत असताना मनोज हा काहीच हालचाल करीत नसल्याचे निदर्शनास आले.
म्हणे मनोज दारू पिऊन होता,आजारी आणि उपाशी होता!
शोभायात्रेतील एका चित्ररथावर शेतकºयाच्या फाशीचा ‘लाईव्ह डेमो’ करताना मनोज धुर्वे या हरहुन्नरी कलावंताचा मृत्यू झाला. त्यानंतर प्रकरण आपल्या अंगावर येईल म्हणून आता आयोजकांसह पोलीस विभागही मृत तरुणावरच चिखलफेक करीत असल्याचे शुक्रवारी आणि शनिवारी चित्र होते. सुरुवातीला रामटेक पोलिसांनी ‘मनोजला अत्यवस्थ वाटू लागल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालयात भरती केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले’, असे पोलीस विभागाने स्पष्टीकरण दिले. त्यानंतर लगेच ‘मनोज हा दारू पिऊन होता. आजारी आणि उपाशी होता’ अशीही वार्ता कळविली. ‘देखाव्यात फास लागून मनोज मृत्यू झाला ही अफवा आहे’ असे ठासून सांगण्यासही पोलीस विभागाने मागेपुढे पाहिले नाही. याबाबत मनोजचे वडील अरुण धुर्वे यांच्याशी स्थानिक प्रतिनिधीने संपर्क साधला असता ‘मनोज हा दारू पिऊन नव्हता. आमच्या कुटुंबाला न्याय मिळावा’ अशी मागणी केली.
मृत्यूप्रकरणात दोषी कोण?
शोभायात्रेत ‘शेतकरी आत्महत्या’चा ‘लाईव्ह डेमो’ सहभागी करून घेण्यास परवानगी दिलीच कशी, हा प्रश्न अनुत्तरित आहे. शोभायात्रा आयोजकांनी ही बाब तपासून का बघितली नाही. शोभायात्रा निघाल्यावरही आयोजक केवळ बघ्याची भूमिका घेत चित्ररथाची सोबत करीत चालत होते. दुसरीकडे सदर चित्ररथाचा मुख्य आयोजक आणि ट्रॅक्टर मालकासही याबाबतची माहिती नव्हती का? हा ‘लाईव्ह डेमो’ जीवघेणा ठरू शकतो, याची थोडीसुद्धा धाकधूक त्याला वाटली नाही का? तिसरी बाब म्हणजे, एखादा देखावा, चित्ररथ हा जीवावर बेतणारा ठरू शकतो हे लक्षात येताच पोलिसांनी त्यास मज्जाव का केला नाही असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. या प्रकरणात शोभायात्रा आयोजक, चित्ररथाच्या आयोजकावर गुन्हा दाखल होणे रास्त आहे.

Web Title:  How to allow the painting painting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.