शस्त्रक्रियेदरम्यान संसर्गाचा धोका कसा टळणार? ‘मॉड्युलर ओटी’ची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 07:00 AM2021-09-14T07:00:00+5:302021-09-14T07:00:11+5:30
Nagpur News मेडिकलच्या विविध विभागांच्या सात शस्त्रक्रियागृहाला नऊ कोटी रुपयांमधून ‘मॉड्युलर ओटी’ म्हणजे अद्ययावत शस्त्रक्रिया गृहाचे स्वरूप दिले जाणार होते. परंतु पाच वर्षे होऊनही यातील चारच ‘ओटी’ अद्ययावत झाल्या.
सुमेध वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलच्या विविध विभागांच्या सात शस्त्रक्रियागृहाला नऊ कोटी रुपयांमधून ‘मॉड्युलर ओटी’ म्हणजे अद्ययावत शस्त्रक्रिया गृहाचे स्वरूप दिले जाणार होते. परंतु पाच वर्षे होऊनही यातील चारच ‘ओटी’ अद्ययावत झाल्या. गायनॅक, इएनटी व नेत्ररोग विभागाच्या शस्त्रक्रियागृहाला अद्यापही ‘मॉड्युलर’ची प्रतीक्षा कायम आहे. यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना होणारा संसर्गाचा धोका कसा टळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेच्या १५० कोटींमधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) विकासासोबतच विविध विभागाचे सात शस्त्रक्रिया गृह अद्यावत होणार होते. २०१६मध्ये या बांधकामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली. सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील युरोलॉजी व हृदय शल्यचिकित्सा विभाग, मेडिकलमधील शल्यचिकित्सा, अस्थिरोग, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र (गायनॅक), कान, नाक व घसा आणि नेत्ररोग विभागाचे असे एकूण सात शस्त्रक्रिया गृह ‘मॉड्युलर’ होणार होते. परंतु ज्या कंपनीला याचे काम मिळाले त्या कंपनीने वेळेत काम पूर्ण केले नाही. उलट शल्य चिकित्सा विभाग, अस्थिरोग विभाग, युरोलॉजी विभाग व हृदय शल्यचिकित्सा विभागाची प्रत्येकी एक अशा चार ओटी मॉड्युलर करण्याला दोन वर्षांचा कालावधी लावला. त्यानंतर कंपनीने उर्वरित तीन ‘ओटी’चे अद्ययावतीकरणाचे कामच हाती घेतले नाही. धक्कादायक म्हणजे, संबंधित कंपनीकडून याचा पाठपुरावाही कोणी केला नाही.
- कंपनीवर कारवाई का नाही?
सात विभागाच्या शस्त्रक्रिया गृहाला ‘मॉड्युलर’चे स्वरूप देण्यासाठी मेडिकल व संबंधित कंपनीसोबत करार झालेला आहे. परंतु पाच वर्षांत केवळ चारच शस्त्रक्रिया गृह अद्ययावत होऊन मागील तीन वर्षात उर्वरित शस्त्रक्रियागृहाच्या कामाला सुरुवातही झाली नाही. विशेष म्हणजे, निधी उपलब्ध असतानाही कंपनीचा चालढकलपणावर कारवाई का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
-अशी आहे ‘मॉड्युलर ओटी’ची संकल्पना
मेडिकलच्या बांधकामाला ७० वर्षांपेक्षा जास्त काळ झाला आहे. या काळात शस्त्रक्रियागृहांमध्ये बदल झाले असलेतरी ते अद्यावत नव्हते. शस्त्रक्रियेच्यावेळी सर्वात जास्त धोका असतो तो संसर्गाचा. तो कमी करण्यासाठी ‘मॉड्युलर ओटी’चा प्रस्ताव समोर आला. यात शस्त्रक्रियागृहांच्या आतून स्टीलचे पत्रे लावले जातात. यामुळे ही ‘ओटी’ बॅकट्रिया फ्री होते. या शिवाय, विशेष तंत्रज्ञानाचा येथे उपयोग केला जात असल्याने शस्त्रक्रियेमध्ये अचूकता येते.
-संबंधित कंपनीसोबत लवकरच बैठक
सातपैकी चार विभागाचे शस्त्रक्रिया गृह ‘मॉड्युलर’ झाले आहेत. उर्वरित तीन विभागाचे शस्त्रक्रियागृहाचे काम प्रलंबित आहे. यासाठी संबंधित कंपनीसोबत लवकरच बैठक घेतली जाईल. ‘मॉड्युलर ओटी’चे काम तातडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील.
-डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल