कसे बनणार आदिवासी युवक आयएएस?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 10:57 AM2018-09-22T10:57:49+5:302018-09-22T11:00:07+5:30
आदिवासी विद्यार्थ्यांचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत टक्का वाढविण्यासाठी आदिवासी विकास विभाग व विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने आठ महिन्याचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे.
मंगेश व्यवहारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आदिवासी विद्यार्थ्यांचा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत टक्का वाढविण्यासाठी आदिवासी विकास विभाग व विद्यापीठांच्या संयुक्त विद्यमाने आठ महिन्याचे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे. जून महिन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कॅम्पसमधील मानव्यशास्त्र विभागाच्या इमारतीतील एका अडगळीत पडलेल्या हॉलमध्ये हे केंद्र सुरू झाले. नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठातील ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या प्रशिक्षणादरम्यान ज्या सुविधा विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणार होत्या त्या पुरविण्यात आल्या नाहीत. या ठिकाणी प्रशिक्षणाचे नियमित वर्गसुद्धा झाले नाहीत. आता फक्त प्रशिक्षणाचे पाच महिने शिल्लक आहेत. प्री आणि मेन्सची तयारी या पाच महिन्यात करायची आहे. ती कशी होणार, याची चिंता विद्यार्थ्यांना आहे.
या केंद्रासाठी विभागाने १ कोटी ८३ लाख २७ हजार रुपयांची तरतूद केली होती. असे असतानाही हे विद्यार्थी अडगळीत पडलेल्या विद्यापीठाच्या एका हॉलमध्ये कुठल्याही सुविधा नसतानाही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. १५ जुलै २०१४ मध्ये शासनाने आदिवासींच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. ट्रायबल रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि राज्यातील सर्व विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने हे केंद्र सुरू करण्यात येणार होते.
२६ डिसेंबर २०१६ ला बार्टीच्या माध्यमातून ‘सीईटी’ घेण्यात आली. मार्च २०१७ मध्ये निकाल जाहीर होऊन राज्यात २२५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तेव्हा राज्यात पुणे वगळता हे केंद्र कुठल्याच विद्यापीठात सुरू झाले नव्हते. लोकमतने यासंदर्भात वारंवार वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेऊन जून २०१८ मध्ये नागपूर विद्यापीठात केंद्र सुरू करण्यात आले. नागपूर विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठांतर्गत निवड झालेल्या ५० विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. प्रशिक्षणादरम्यान या विद्यार्थ्यांना चार हजार रुपये विद्यावेतन व सहा हजार रुपये अभ्यासाच्या साहित्यासाठी अनुदान देण्यात येणार होते. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातून अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगून विद्यार्थी प्रशिक्षणासाठी नागपुरात आले. प्रशिक्षण सुरू होऊन तीन महिन्याचा कालावधी उलटला आहे. पण या विद्यार्थ्यांना ना विद्यावेतन मिळाले, नाही पुस्तकाचे अनुदान. शासन निर्णयानुसार या केंद्रात लायब्ररीसाठी एक लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. पण येथे ना लायब्ररी बनली, नाही अभ्यासाला पुरक पुस्तके उपलब्ध झाली. साधे वर्तमानपत्र सुद्धा येथे पोहचत नाही. तज्ञ शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येणार होते. त्याचेही नियमित वर्ग होत नाही. त्यामुळे तीन महिन्यात एकही विषय पूर्ण झाला नाही. विद्यार्थ्यांना आपल्या घरून राहण्याचा, खाण्याचा, अभ्यासाच्या साहित्याचा खर्च करावा लागत आहे. कोट्यवधीची तरतूद असतानाही, ही परिस्थिती बघून काही विद्यार्थी प्रशिक्षण सोडून गेले आहे.
केंद्राचीही दूरवस्था
विद्यापीठात नावापुरते हे केंद्र सुरू करण्यात आले आहे. केंद्राचे समन्वयक म्हणून डॉ. सत्यप्रिय इंदूरवाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी केंद्राला भेट दिली असता, तुटलेल्या खिडक्यांच्या तावदानातून पावसाचे पाणी हॉलमध्ये आले होते. हे केंद्र सुरू करणे, बंद करण्यासाठी कुठलाही कर्मचारी नव्हता. विद्यार्थ्यांना साधे पाणी पिण्यासाठी सुद्धा दुसऱ्या विभागात जावे लागत होते. समन्वयकाची गेल्या महिन्याभरापासून भेट नसल्याचे सूत्रांची माहिती आहे. काही विद्यार्थी २४ तास येथे बसूनच अभ्यास करीत असल्याने त्यांच्याच भरवशावर केंद्र सुरू आहे.