कशी करणार डेल्टा प्लसची नाकेबंदी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:12 AM2021-08-15T04:12:13+5:302021-08-15T04:12:13+5:30

शिरीष खोबे नरखेड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका नरखेड तालुक्याला बसला. यात अनेकांचा मृत्यू झाला; मात्र कोरोनाची लाट ...

How to block Delta Plus? | कशी करणार डेल्टा प्लसची नाकेबंदी?

कशी करणार डेल्टा प्लसची नाकेबंदी?

Next

शिरीष खोबे

नरखेड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका नरखेड तालुक्याला बसला. यात अनेकांचा मृत्यू झाला; मात्र कोरोनाची लाट ओसरत असताना नरखेडकरांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. नरखेड शहराचा विचार करता येथे १०० पैकी १० जणांच्या तोंडावर मास्क लागलेले दिसून येते. जे १० नागरिक मास्कचा वापर करतात त्यापैकी ५ जणांचे मास्क हनुवटीवर दिसून येतात, त्यामुळे नागरिकच प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत असतील तर सरकारी यंत्रणांना दोष देऊन उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सायंकाळ होताच नरखेड शहर आणि ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना झोपी जात असल्याचे चित्र सध्या आहे. सामाजिक कार्यक्रमांना बंधन असताना व मर्यादित नागरिकांच्या उपस्थित साजरा करण्याची परवानगी असताना त्याचे कुठेही पालन होत नाही. कोरोना संकटाला दूर ठेवण्यासाठी तोंडाला मास्क बांधणे, सातत्याने हात धुणे, वेळोवेळी सॅनिटायझरचा उपयोग करणे, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे हे प्रशासनाच्यावतीने वारंवार सांगण्यात येत असले तरी याचे कुठेही पालन होताना दिसत नाही. शहरी भागात कारवाईच्या भीतीने नागरिक शहरात फिरताना तोंडाला मास्क बांधतात; परंतु कारवाई करणारे पथक गेल्यावर मास्क खाली उतरतो. शनिवारी नगर परिषद, गुजरी बाजार, सामान्य रुग्णालय, स्वामी विवेकानंद चौक, बँक परिसर, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय या भागात नजर टाकली असता, १०० पैकी १० नागरिकांनी मास्क लावल्याचे दिसून आले.

---

असा नरखेडचा ग्राफ

एकूण रुग्ण : ७,०९६

बरे झालेले : ६,९४५,

मृत्यू : १५०

सध्या उपचार सुरू : १

---

असे झाले लसीकरण

पहिला डोस : ५७,६४१

दुसरा डोस : १९,११४

---

शासकीय कार्यालयातही उल्लंघन

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आता कुठेही दक्षता घेतली जात नाही. शासकीय कार्यालयात यापूर्वी प्रत्येक व्यक्तीला हात सॅनिटाईझ केल्यानंतर प्रवेश दिला जात होता. त्याच्या नावाची नोंदणी केली जात होती. मास्क लावण्याच्या सूचना केल्या जात होत्या. आता मात्र असे होताना दिसत नाही. ग्रामीण भागातील दुकाने, बैठकीच्या पारा, आठवडी बाजार, भाजीपाल्याचे दुकानेही बिनधास्त सुरू आहेत. कोरोनाचे रुग्ण नसल्यामुळे कुठेही कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग होत नाही.

---

आरोग्य यंत्रणेपुढे आवाहन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा ग्रामीण भागाला सर्वाधिक फटका बसला होता. पुन्हा डेल्टा प्लसचा किंवा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका संभावल्यास आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. तालुक्यातील मूकबधिर विद्यालयातील कोरोना सेंटर सुरू असून, तेथील कर्मचारीवर्ग मुक्त केला आहे, तसेच आय.टी.आय. मधील कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. सद्यस्थितीत डेल्टा प्लसचा प्रभाव उद्भवल्यास उपलब्ध स्टाफमधूनच उपचाराची सुविधा देण्यात येईल, असेही सांगण्यात येत आहे.

---

डेल्टा प्लसचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. ऑक्सिजन साठा, ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन, स्टाफचे ट्रेनिंग, औषध साठा पूर्णपणे उपलब्ध आहे. नागरिकांनी मात्र प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

- डॉ. विद्यानंद गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी.

Web Title: How to block Delta Plus?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.