बियाणे आणि खतांची खरेदी करायची कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 05:47 PM2020-04-17T17:47:56+5:302020-04-17T17:48:23+5:30
बॅँकेतील पीक कर्ज डोंगराएवढे असल्याने आणि पीक कर्जाचा गुंता न सुटल्याने बियाणे आणि खतांची खरेदी करायची तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
अभय लांजेवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रबी हंगामाचा शेवट शेतकऱ्यांसाठी कडू ठरला. अकाली आलेल्या पावसाने रबी पीक हिरावून नेले. त्यातच कोरोना विषाणूच्या ‘एन्ट्री’ने नागरिकांसह शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले. त्यातही बॅँकेतील पीक कर्ज डोंगराएवढे असल्याने आणि पीक कर्जाचा गुंता न सुटल्याने बियाणे आणि खतांची खरेदी करायची तरी कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बळीराजा हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेल्या या ‘अर्थ’चक्राच्या संकटावर शासनाने योग्य उपाययोजना आखावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
उमरेड परिसरात कपाशी आणि सोयाबीन पीक मुबलक प्रमाणात घेतल्या जाते. साधारणपणे एप्रिल महिन्याची ही वेळ म्हणजे चणा, गहू आणि अन्य साठवलेले धान्य बाजारात विकून खरीपाची पूर्वतयारी करण्याची असते. बियाणांच्या बाबतीत निदान विचारणा तरी सुरू होते. कोरोनामुळे कृषी केंद्र आता कुठे जेमतेम सुरू झालेली दिसतात. दुसरीकडे शेतकऱ्यांची रेलचेल मात्र दिसून येत नाही.
पैसाअडकाच नसल्याने कृषी केंद्रात केवळ ‘भाव’ विचारायला जायचे काय, असा मार्मिक सवाल शेतकऱ्यांचा आहे. उमरेड तालुक्यात ७९ कृषी सेवा केंद्र आहेत. शहरात ही संख्या २६ आहे. केंद्रचालकांनी बियाणांसाठी संबंधित कंपन्यांकडे आपल्या मागण्या नोंदविल्या आहेत. या भागात उन्हाळी हंगामात पीक घेतले जात नसल्याने तूर्त बियाणांची गरज नाही. असे असले तरी कृषी केंद्रात यावेळी शेतकऱ्यांची लगबग असते, अशी माहिती केंद्रसंचालक बाळू इंगोले यांनी दिली. सर्वांचीच हालत खस्ता झालेली आहे. त्याचे परिणाम आतापासूनच दिसत आहेत, अशीही बाब ते बोलले. सर्व कृषी केंद्र चालकांनी योग्य नियोजन आखले असून योग्य ती खबरदारी सुद्धा आम्ही घेत आहोत, अशी माहिती अॅग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय मुंडले यांनी दिली.
सबसिडी पॅकेज हवे
शेतकरी चौफेर संकटात आहेत. त्यातही हमीभावाने खरेदी सुरू झालेली नाही. खरेदी सुरू केल्यानंतरही रक्कम तातडीने मिळेल याचीसुद्धा हमी राहिलेली नाही. या बाबींचा अभ्यास केल्यावर बियाणे आणि खतांसाठी स्वतंत्र सबसिडी पॅकेज शासनाने जाहीर करावे, अशी मागणी भाजप किसान विकास आघाडीचे नेते आनंद राऊत यांनी केली आहे. हमीभावाने खरेदी सुरू करून तातडीने रक्कम दिल्यास काही शेतकऱ्यांना निश्चितच दिलासाही मिळेल, असेही ते म्हणाले.
बियाण्यांची मागणी
उमरेड तालुक्यात सुमारे ८,५०० क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. कपाशीच्या बियाण्यांचे ६१ हजार पॉकेट (४५० ग्रॅम प्रति पॉकेट), तूर २५० क्विंटल, भात ८०० क्विंटल आदी बियाण्यांची मागणी संबंधित कपंनीकडे करण्यात आलेली आहे. बियाण्यांची आवकही काही प्रमाणात सुरू झाली असून येत्या काही दिवसात बियाणे कृषी केंद्रात पोहचतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
खतांचेही नियोजन
‘मे’ च्या अंतिम आठवड्यात खतांच्या खरेदीचा कालावधी सुरू होतो. सध्या खतांची गरज नसली तरी त्याचे नियोजन पूर्वीपासूनच आखले जाते. तालुक्यात एकूण १६,२९२ मेट्रिक टन खतांची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये युरिया ५,१००, डीएपी २,१०० आणि एसएसपी २,६०० मेट्रिक टन खतांचा समावेश आहे.
शासनाने कृषीविषयक बाबींचे निर्बंध हटविले आहेत. यामुळे खते-बियाणे अन्य राज्यांतून, जिल्ह्यातून येत असले तरी वाहतुकीसाठी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. योग्य नियोजन आखले असल्याने खते आणि बियाण्यांची टंचाईसुद्धा भासणार नाही.
- संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी, उमरेड